आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना लुटणार्‍या संस्थांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खासगी शिकवण्यांच्या बनवेगिरीला आळा बसवण्यासाठी आता धडक कारवाई केली जाणार आहे. ज्या खासगी कोचिंग क्लासेस आणि सीएस संस्था जाहिरातींचा वापर करून मेरिटची खोटी यादी झळकवून विद्यार्थ्यांची लूट करतील, अशा संस्थांवर ‘द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’ची रिजनल कौन्सिल नजर ठेवून आहे.

दरवर्षी मोठय़ा प्रमाणात देशभरातून ‘सीएस’साठी (कंपनी सेक्रेटरी) विद्यार्थी परीक्षा देतात. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वाढत्या संधी आणि उत्तम पगाराची हमी असल्याने या क्षेत्राला आता ग्लॅमर आले आहे; परंतु ‘सीएस’मध्ये आमचेच विद्यार्थी मेरिटमध्ये आल्याची टिमकी अनेक संस्था वाजवतात. ऑल इंडिया रँक मिळालेली नसतानाही या संस्था कधी पंचवीस, तर कधी तीस विद्यार्थी मेरिटमध्ये आल्याचे भासवून विद्यार्थ्यांना आकर्षित करून त्यांची लूट करतात. फसव्या आश्वासनांना पालकही बळी ठरतात. गुणवत्ता नसतानाही अशा संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नंतर नुकसान होते. म्हणून ‘द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’ या संस्थेने अशा संस्थांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. तशा सूचनाही संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.

यासंबंधी ‘सीएस’चे अध्यक्ष श्याम अग्रवाल म्हणाले की, आमच्याकडे काही संस्थांनी बनवेगिरी केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, असे वाटत असेल तर पालक आणि विद्यार्थ्यांनीदेखील सतर्क राहायला हवे; परंतु आपल्याकडे स्पध्रेत टिकण्यासाठी लोक काहीही करतात. परिणामी चुकीच्या गोष्टी समोर आल्यावर पश्चात्ताप करतात. याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो.

विद्यार्थ्यांवरही होऊ शकते कारवाई
‘आयसीएसआय’च्या नियमानुसार खासगी संस्थेच्या प्रलोभनास बळी पडत स्वत:चे मेरिट छापून आणण्याचे अधिकार विद्यार्थ्यांना नाहीत, परंतु संस्थांच्या भूलथापांत येऊन मेरिट लिस्टमध्ये नाव देणारे विद्यार्थीदेखील दोषी आहेत. त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे संकेतस्थळावर इन्स्टिट्यूटची जी मेरिट यादी जाहीर होईल, तीच योग्य मानावी.