आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनस्ताप: जनशताब्दी, हैदराबाद पॅसेंजरची रचना प्रवाशांसाठी डोकेदुखी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस आणि औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजरच्या डब्यांमधील विचित्र रचनेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. स्थानकात येणार्‍या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मनस्ताप होत आहे. अंकगणिताच्या क्रमाने डब्यांचे क्रमांक असतील, अशी भावना मनात ठेवून रेल्वे स्थानकावर येणार्‍यांचा भ्रमनिरास होत आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस
औरंगाबाद ते दादर धावणारी रेल्वेगाडी सकाळी सहा वाजता औरंगाबादहून निघते. गाडी दुपारी 12.30 वाजता दादरला पोहोचते. सकाळी ही रेल्वेगाडी औरंगाबाद स्थानकावर थांबते. इंजिनानंतर आठ क्रमांकाचा डबा प्रथम आहे. डब्यांची 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9 या प्रमाणे असल्यामुळे प्रवासी संभ्रमात पडतात.

औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर
औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर दुपारी 3.30 वाजता औरंगाबाद स्थानकाहून हैदराबादसाठी निघते. साडेपंधरा तासांच्या प्रवासानंतर गाडी सकाळी सात वाजता हैदराबादला पोहोचते. गाडीला तीन स्लीपर क्लास आरक्षणाचे डबे आहेत, तर साधारण दर्जाचे आठ डबे आहेत. गाडी स्थानकावर लागल्यानंतर एस-1, एस-2 डबे लागोपाठ लावले असून, एस-3 हा आरक्षित डबा सर्वात शेवटी लावलेला असतो. प्रवाशांनी आपल्या कुटुंबासह आरक्षण केलेले असल्याने काहीचा क्रमांक एस 2 मध्ये असतो तर उर्वरित सदस्य एस 3 मध्ये जातात. तिन्ही डबे सलग नसल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरक्षण करूनही 15 तास 30 मिनिटांच्या प्रवासात वाताहत होते. पती-पत्नी असतील तर पती जर एस 2 मध्ये असला तर पत्नीचे आरक्षण एस-3 मध्ये जाते. एस 2 व एस 3 हे दोन डबे सलग नसून यामध्ये पाच डब्यांचे अंतर असल्याने पत्नीच्या सुरक्षेच्या चिंतेने पती साडेपंधरा तास हैराण असतो.

अशी होते परवड
प्रवासी सकाळी सहा वाजता धावत पळत जनशताब्दी पकडण्यासाठी स्थानकावर पोहोचतात. रेल्वेगाडी सहा वाजता सुटत असल्याने शेवटच्या पाच मिनिटांत येणार्‍यांना आठ क्रमांकाचा डबाच सापडत नाही. क्रमाने डबे शोधायला सुरुवात केल्यानंतर आठ क्रमांकाच्या डब्यात आरक्षण असलेले प्रवासी 5, 6, 7 क्रमांकाचा डबा इंजिनच्या मागे लागलेला दिसतो. त्या डब्यात बसण्यासाठी पुन्हा धावपळ सुरू होते. डबा शोधण्याच्या प्रयत्नात अनेक प्रवाशांची रेल्वेगाडी सुटून जाते आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.

पती-पत्नीला विभक्त करणारी गाडी
औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर ही पती-पत्नीला विभक्त करणारी गाडी आहे. एस 1 ते 3 पर्यंतचे तीन आरक्षित डबे सलग असायला पाहिजेत. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की गैरसोयीसाठी, हेच समजत नाही. मी महिन्यात एकदा उपरोक्त या गाडीने प्रवास करतो व मला गाडीच्या व्यवस्थापनाची प्रचिती येते.
-जगन्नाथ बसैये, पॅसेंजरचे मासिक प्रवासी.


मुंबई-हैदराबादमधून प्रश्न सुटू शकतो
जनशताब्दीचे नियोजन मुंबईतून व औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजरचे नियोजन हैदराबादहून होते. पॅसेंजर लिकिंगमध्ये चालत असल्याने आरक्षित डबे सलग ठेवले जात नाहीत, परंतु नियोजन केले तर सलग घेणे शक्य आहे.
-एल. के. जाखडे, रेल्वे वाहतूक अधिकारी औरंगाबाद.

कर्मचार्‍यांचे प्रताप
मुंबईमधील रेल्वे कर्मचार्‍यांच्या प्रतापामुळे जनशताब्दीचा 8 क्रमांकाचा डबा इंजिननंतर लावला जातो. रेल्वे कर्मचार्‍यांच्या वेळकाढूपणामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना.