आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी रेल्वेगाड्यांबरोबरच मालगाड्याही महत्त्वाच्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रेल्वेमार्ग हे केवळ प्रवासी गाड्या चालवण्यासाठी नसून त्यावर मालगाड्या चालवल्या तरच रेल्वेला महसूल मिळेल. त्या महसुलावरच विविध विकास योजनांना आकार देणे शक्य असल्याचे मत दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक देविप्रसाद पांडे यांनी व्यक्त केले. नांदेड विभागासाठी एका प्रवासी रेल्वेसोबत एक नवीन मालगाडी सुरू करण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनमाड ते नांदेडदरम्यानच्या ट्रॅक इन्स्पेक्शनसाठी पांडे बुधवारी (8 मे) औरंगाबाद स्थानकावर आले होते. सकाळी 9 वाजता मनमाड येथून त्यांनी विंडो इन्स्पेक्शनला प्रारंभ केला. सकाळी 11 वाजता त्यांची तीन डब्यांची गाडी औरंगाबादला दाखल झाली. औरंगाबादसाठी केवळ पाच मिनिटांचा वेळ असतानाही त्यांनी स्थानकावरील व्हीआयपी हॉलमध्ये पत्रकारांशी तासभर चर्चा केली. त्यांच्यासोबत नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. सोईन, मुख्य मेकॅनिकल इंजिनिअर एम. प्रसाद, मुख्य अभियंता नितीशकुमार रंजन आदींची उपस्थिती होती.

पांडेंचा व्यावसायिक दृष्टिकोन
दुहेरीकरण, नवीन गाड्या सुरू करणे, धुलाई केंद्र उभारणे आदींसाठी मोठय़ा प्रमाणावर निधीची आवश्यकता असून मराठवाड्यातील रेल्वेच्या योजनांना अंतिम रूप द्यायचे झाल्यास महसूल वाढणे जरुरी आहे. केवळ प्रवासी गाड्यांतून महसूल मिळत नसून मालगाड्या मोठय़ा प्रमाणावर सुरू झाल्यास योजनांना मूर्त रूप देणे शक्य होईल, असे मत पांडे यांनी मांडले.

मुकुंदवाडीत क्रॉसिंग अशक्य
कुठल्याही स्थानकावर क्रॉसिंग लाइन टाकायची झाल्यास साडेपाच कोटी रुपयांचा खर्च येतो. एक तर लेव्हल क्रॉसिंग बंद करणे अथवा फाटकावर कर्मचारी ठेवण्याचे सर्वोच्च् न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे चिकलठाणा येथील क्रॉसिंग बंद करून मुकुंदवाडी येथे करणे अशक्य असल्याचे पांडे यांनी सांगितले.

मनपाने पर्यायी जागा द्यावी
रेल्वेस्थानकाजवळील जागा मनपा विकास करण्यासाठी मागत आहे, परंतु रेल्वेला ही जागा सोडणे शक्य नाही. मनपाने योग्य जागा मोबदल्यात दिल्यास त्याचा विचार होईल.

औरंगाबादशी संबंधित मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन
>जालना-नगरसोल डेमू शटल मनमाडपर्यंत वाढवून नांदेड-अमृतसर-सचखंड एक्स्प्रेस व नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस यावरील ताण कमी करण्यासाठी >शटलला मनमाड ते औरंगाबाद व औरंगाबाद ते मनमाड चालवून सायंकाळी 5.30 वाजता मनमाड ते जालना चालवणे.
>मनमाड ते काचिगुडा ही सकाळी 7.40 वाजता औरंगाबादहून जाणारी पॅसेंजर नेहमी लेट होत असून नांदेडच्या वेळेवर सिकंदराबादला पोहोचत नाही.
>काचिगुडा ते मनमाड ही सायंकाळी 6 वाजता औरंगाबाद स्थानकावरून सुटणारी गाडी मनमाडजवळील अंकाई स्थानकावर रात्री 12 वाजेपर्यंत थांबवून ठेवली जाते. त्यामुळे वैष्णोदेवी जाणार्‍या भाविकांना झेलम एक्स्प्रेस पकडता येत नाही.
>नांदेड विभागातील स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे
>जोधपूर ही स्पेशल हॉलिडे रेल्वे चालवावी. यास मोठी मागणी येत असून ती चालवण्यास प्राधान्य दिले जाईल.

मॉडेल स्टेशनसाठी एकच फेज
औरंगाबाद मॉडेल स्टेशनच्या दुसर्‍या फेजचे काम पाच कोटी निधीअभावी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मॉडेल स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचे फेज नसून एकाच फेजमध्ये हे काम केले जाते. औरंगाबाद स्टेशनसाठीचे उर्वरित काम लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बजेटमधील गाड्या वर्षअखेरीस
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या बजेटमध्ये औरंगाबादकरांना नवीन तीन गाड्या व एक विस्तारित गाडी दिली आहे. उपरोक्त गाड्या एका वर्षात सुरू होणे गरजेचे आहे. रेल्वे कोचअभावी गाड्या वेळेवर सुरू करणे शक्य होत नाही. या वर्षी चार हजार कोच तयार झाल्याने औरंगाबादहून जाणार्‍या नागपूर- कुर्ला, निजामाबाद-कुर्ला, चेन्नई-नगरसोल या गाड्या डिसेंबर-जानेवारीपर्यंत सुरू होतील. नरसापूर-नगरसोल गाडी नियमित केली जाईल. याशिवाय वर्ष 2011-2012 बजेटमधील नांदेड विभागाला मिळालेल्या चार गाड्या सुरू करणे शक्य असल्याचे व्यवस्थापक पांडे यांनी सांगितले.

कांद्यासाठी मालगाडी
व्यावसायिक धोरणावर भर देणार्‍या व्यवस्थापक पांडे यांना दोन वर्षांपासून नगरसोल येथून कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी चालवण्यात येणारी मालगाडी बंद असल्याचे मराठवाडा प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी यासंबंधीची माहिती घेतली. मालगाडीसाठी नगरसोल स्थानकावर साइडलाइन टाकण्यात आलेली नाही. तीन लूप लाइन असून साइडलाइन नसल्याने सुमारे पंधरा कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. येवला, मनमाड व भुसावळ येथून कांदा रेल्वेने बाहेर पाठवला जातो, असे निदर्शनास आणून दिले.