आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Rain Water And Drainage System Problem

रस्त्यांची बांधणी चुकीची, ड्रेन यंत्रणाही कुचकामी, पर्यटननगरीला दरवर्षीचा ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ते तयार करताना केलेल्या तांत्रिक चुका, पाण्याचा निचरा होणार्‍या यंत्रणेचा अभाव, कुचकामी ठरलेली ड्रेन यंत्रणा, चुकीचे पॅचवर्क करून काम भागवण्याची वृत्ती, नाल्यांवरील अतिक्रमण आणि या सर्वांवर मनपा अधिकारी-पदाधिकार्‍यांचे मौन.. यामुळे शहरात पहिला पाऊस पडताच मुख्य रस्त्यांवरच तळी साचतात. नेमेचि येतो पावसाळा तसाच नेमेचि साचतात तळी, ही या ऐतिहासिक आणि औद्योगिक शहराची स्थिती. थोडासा पाऊसही ही पोलखोल करतो.

लेमन ट्री ते मेडिएटर्स सेक्युरिटीज रस्ता
कारण : या रस्त्यावर गोलाकार तळे साचते. व्हीआयपी रस्त्यावर उतार आणि सíव्हस रस्त्याचा एका बाजूने उतार, तर दुसर्‍या बाजूने चढ आहे. पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद आहेत.

उपाय : सिडकोच्या काळात व्हीआयपी रस्त्यावरून ग्रीन बेल्टच्या मधोमध सíव्हस रस्त्याला जोडणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा पूल होते. या पुलाखालून एक मोठा सिमेंट पाइप होता. आता हा पाइप ग्रीन बेल्टखाली दबला. त्याला उकरू न काढल्यास ही समस्या दूर होईल.

वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर
कारण : ड्रेनेज यंत्रणेवर सार्वजनिक बांधकाम खात्याने फुटपाथ केला. त्याखाली ड्रेन यंत्रणा बुजली. नळकांड्या तुटल्या. फुटपाथ उंच झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. पर्यायाने या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचते.

उपाय : फुटपाथच्या खालून बुजलेली भूमिगत गटारे उकरून ग्रीन बेल्टमध्ये पाण्याचा निचरा करावा.

औरंगपुरा बस थांबा
कारण : सरस्वती भुवन कॉलनी, महात्मा फुले चौक आणि निराला बाजार अशा तिन्ही भागांकडून उतार असल्याने या खोलगट भागात पाणी साचते. त्यात पाणी जाण्यासाठी कुठे जागाच नाही.

उपाय : कॅचपीट चेंबर बनवून पुढे नाल्यात हे पाणी सोडावे किंवा रस्ता उंच करून नाल्याच्या दिशेने कॅबर यंत्रणा करून रस्ता नाल्याच्या दिशेन पसरट करावा.

सेव्हन हिल्स उड्डाणपूल
कारण :या रस्त्याची दुसरी बाजू खूप उंच आहे. तिकडे पडलेले पाणी या खोलगट भागात येत व साचते. पाण्याच्या निचरा होण्यासाठी छोटीशी नाली काढली होती, पण तिचा काहीही उपयोग झाला नाही.

उपाय : रस्त्याची लेव्हल करावी. मुरुमाचा भराव करून हा खोलगट भाग उंच करावा व पाणी जाण्यासाठी नाली करावी.

अमरप्रीत ते काल्डा कॉर्नर
कारण : मुख्य जालना रस्ता उंचीवर असल्याने खाली पाणी येते व या रस्त्यावरील खोलगट भागात साचते. एका बाजूला फुटपाथ व पुढे डिव्हायडर असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तशी व्यवस्थाच नाही.

उपाय : ट्रामवॉटर ड्रेन यंत्रणा राबवून पाणी नाल्यात सोडावे.

मोंढा नाका
कारण : येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उतार आहे. मध्येच खोलगट भाग असल्याने पाणी साचते. येथील काही व्यापार्‍यांनी स्वखर्चाने भराव केल्याने जालना रस्त्यावर खोलगट भाग झाला. आता या उतारावरही पाणी तुंबते.

उपाय : पालिके ने भराव करावा, अन्यथा रस्त्याची लेव्हल समांतर करावी. पॅचवर्क करावे.

येथेही होते अडचण

0 आबासाहेब गरवारे मार्ग, जळगाव रस्ता

0 नाथ मार्के ट, शिवाई ट्रस्टसमोर, औरंगपुरा

0 सावरकर चौक, सिल्लेखाना रस्ता

0 सिल्लेखाना चौक ते पैठणगेट मार्ग

0 चिश्तिया चौक ते एमजीएम मार्ग

0 सिडको एन-6 मथुरानगर चौक

0 सिडको एन-8 बजरंग चौक

0 सिडको एन-2 कामगार चौक

0 खडकेश्वर चौक

0 रेल्वेस्थानक चौक

0 पीर बाजार, उस्मानपुरा चौक

0 टिळकनगर चौक

ही आहेत अन्य कारणे
शहरात 50 मुख्य चौक आहेत. बहुतांश रस्ते 12, 18, 20, 30, 36 मीटर रुंदीचे आहेत. तर एकमेव बाबा पेट्रोलपंप ते क्रांती चौक हा रस्ता 45 मीटर आहे.
नाल्यांची थातुरमातुर सफाई होते. तसेच रस्त्याच्या कडेला असणार्‍या तीन फुटी नाल्यांची सफाई होत नाही. चौकांलगत असणार्‍या कॅचपीट चेंबरच्या जाळीतील कचरा स्वच्छ होत नाही.

काय आहेत अन्य उपाय
चौकांचा नकाशा करावा : पाण्याचा निचरा करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण तसेच रस्ते व साइड गटारांचा नकाशा तयार करावा. सखल भागातील रस्त्यांवर गटारी बांधाव्यात. गटारात कुणी पडू नये म्हणून त्यावर सिमेंट जाळ्या बसवाव्यात. वर्षातून एकदा नियमित सफाई करायला हवी.

> कॅचपीट यंत्रणा करा : जिथे पाणी साचते ती लेयर डांबरीकरणाच्या माध्यमातून भरून काढावी. या रस्त्याच्या कडेला अडीच फुटांचे चौकोनी कॅचपीट चेंबर बनवावे. या चेंबरची पाइपलाइन लगत असलेल्या स्ट्रॉम वॉटर गटाराला जोडावी अथवा ही यंत्रणा आसपासच्या नाल्यांना जोडावी.

> केंबर सिस्टिम : रस्ता जर 18 मीटर रुंद असेल तर सुरुवातीला रस्त्याचा 9 मीटर पृष्ठभाग पसरट करावा. डिव्हायडरला छिद्र पाडून पाइप टाकून पुढे पुन्हा 9 मीटर रस्ता पसरट करावा. उतारावरून हे पाणी ड्रेनेज अथवा स्वतंत्र कॅचपीट करून नाल्यात सोडावे.

> ट्रॉम वॉटर यंत्रणा असावी : उतारावरील खोलगट भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र स्टॉम वॉटर यंत्रणा असावी. भूमिगत गटारीत आरसीसी पाइप टाकून हे पाणी नाल्यात सोडावे.

300 कोटींची योजना आहे
शहरातील मुख्य रस्त्यांवर ड्रेन वॉटर यंत्रणेसाठी 300 कोटींची तरतूद आहे. नगरोत्थान योजनेत हा प्रस्ताव दाखल आहे. त्याला मंजुरी मिळेपर्यंत परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मोठा पाऊस झाला तर अर्धा तास तळी साचून रस्ता व्यापतात, मात्र त्यानंतर पाण्याचा निचरा होतो.
शेख खमर, उपअभियंता, मनपा