आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीत परवड : साडेसात लाख लोकांच्या हक्काची साखर, तेल गायब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - श्रावण महिन्यांपासून विविध सणांची सुरुवात होते. त्यामुळे सगळ्यांच्या घरांमध्ये गोडधोड केले जाते; पण ऐन सणासुदीच्या काळातच रेशन दुकानामध्ये साखर व तेल उपलब्ध होत नसल्यामुळे सुमारे साडेसात लाख नागरिकांना साखर व तेलाविना हे सण साजरे करण्याची वेळ आली आहे.

बाजारात सध्या साखर 44 रुपये किलो आहे. स्वस्त धान्य दुकानात हीच साखर एपील कार्डधारकांना 20 किलो, तर बीपीएल, अन्नपूर्णा व अंत्योदय कार्डधारकांना 13.50 रुपये प्रतिकिलोने देण्यात येते. तसेच बीपीएल कार्डधारकांना तेल 28 रुपये लीटर, एपीएल कार्डधारकांना 50 रुपये लिटरने तेल दिले जाते. बाजारात हेच तेल 70 रुपये लिटरप्रमाणे खरेदी करावे लागते. बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना दर महिन्याला तेल, साखर, गहू, तांदूळ पुरवणे ही सरकारची जबाबदारीच आहे. मात्र, दोन वर्षांपासून सर्वच राशन दुकानांतून एपीएल कार्डधारकांची साखर गायब झाली आहे. तसेच आता महिना उलटून गेला, तरी स्वस्त धान्य दुकानांधून अद्याप बीपीएल व इतर कार्डधारकांसाठी मंजूर झालेली साखर मिळालेली नाही. याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांनी राशन पुरवण्याची जबाबदारी प्रशासनाची, तर प्रशासनाने हे सरकारी धोरण असल्याची माहिती देऊन जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे नागरिकांना मात्र दाम दुपटीने तेल, साखर खरेदी करावी लागत आहे.
असे आहे धोरण - दरमहा 1 तारखेला साखरेची मागणी किती आहे यासंदर्भाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती ठेवण्यात येते. त्यानंतर मंजुरी मिळालेला साठा संबंधित जिल्ह्यात पोहोचवला जातो. त्यानंतर ते धान्य दुकानदारांकडे वितरित होते. तेल सहा अथवा चार महिन्यांतून एकदा येते.

या महिन्याची मागणी - ऑगस्ट महिन्यात साखरेची 2300 क्विंटल मागणी असून या 1600 क्विंटल साखर मंजूर झाली आहे; पण उपलब्ध झालेली नाही. तसेच प्रत्येक कार्डधारकास 1 तेल बॅगची मागणी असून तेही अद्याप उपलब्ध नाही.
हे सरकारी धोरण - साखर व तेलाचे धोरण हे सरकारचे आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात येईल त्याचे वाटप करून ते नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवतो. या महिन्यात झालेल्या उशिराची चौकशी करून दोषींवर कारवाई करू. ’’ कुणालकुमार, जिल्हाधिकारी
अद्याप खरेदी सुरू - सरकारची साखर खरेदी अद्यापही सुरू आहे. त्यामुळे साखर नाही, तर तेल आस्ट्रेलियाकडून सरकारच खरेदी करतात. पण ते अद्याप उपलब्ध झाले नसल्यामुळे तुटवडा आहे.’’ के. वाय. बोडखे, जिल्हा पुरवठा अधिकारी
गरिबांच्या मुळावर धोरण - वास्तविक बीपीएल व अंत्योदय प्रकारातील नागरिकांना दरमहा जीवनावश्यक वस्तू पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारचे धोरण गरिबांच्या मुळावर उठणारे आहे.’’ सुभाष लोमटे, समाजवादी जनपरिषदेचे अध्यक्ष