आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुणवत्तेत मुलीच पुढे; पण मुलांपेक्षा संख्येत मागे! औरंगाबादच्या निकालात २४ टक्के वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय शिक्षण मंडळांनी घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के लागला. या परीक्षेत मुलांच्या तुलनेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारून आपली गुणवत्ता सिद्ध केली. मुलींची पास होण्याची टक्केवारी ९४.२९ टक्के आहे, तर मुलांची टक्केवारी ८८.८० टक्के एवढी आहे. गुणवत्तेत मुली पुढे असल्या तरी मुलांच्या तुलनेत बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलींची संख्या अद्यापही खूपच कमी आहे.

औरंगाबाद विभागातून या वर्षी ७९७३० मुले आणि ४६३२० मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ७२१९२ म्हणजेच ९०.५५ टक्के मुले आणि ४३४८७ म्हणजेच ९३.८८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असल्या तरी मुलांच्या तुलनेत उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या प्रमाणात अद्यापही मोठी विषमता आहे. २०१३ मध्ये ५०४६६ मुली माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यापैकी केवळ ४६३२० मुलीच बारावीची परीक्षा दिली. ४१४६ मुलींना बारावीपर्यंत पोहोचताच आले नाही. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या प्रवाहात मुलींचा समावेश मुलांच्या तुलनेत दुर्लक्षितच राहिल्याचे निकालाची आकडेवारी सांगते. त्याला सामाजिक- आर्थिक घटक कारणीभूत आहेत. ही विषमता दूर होण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत.

औरंगाबाद विभागाचा निकाल ९१.७७ टक्के लागला. गेल्या चार वर्षांत औरंगाबाद विभागाचा निकाल २४ टक्क्यांनी वाढला आहे. औरंगाबाद विभागातही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.३३ टक्क्यांनी अधिक आहे. कॉपीमुक्तीचा ध्यास घेऊन विशेष कृती कार्यक्रम राबवणाऱ्या उपक्रमास यश आल्याचा शिक्षण मंडळाचा दावा आहे. २०१२ मध्ये विभागाचा निकाल ६०.७१ % होता. विभागीय शिक्षण मंडळ, शिक्षक आणि स्वत: विद्यार्थ्यांनी ‘कॉपीमुक्ती’ला साथ दिल्यामुळे यंदा ९१.७७ टक्के निकाल लागला आहे.
खंडामुळे लाभ
विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या वर्षीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करतानाच प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षेदरम्यान खंड ठेवला होता. जुलै २०१४ मध्येच वेळापत्रकही जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नीट नियोजन करता आले आणि ही परीक्षा तणावमुक्त झाली.

४ जून रोजी गुणपत्रिका
कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वाटप चार जून राेजी हाेईल. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात त्याच दिवशी दुपारी तीन वाजता मिळतील. ज्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत ४ ते १५ जून अशी आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत हवी असल्यास त्यांनी संबंधित मंडळाकडे २७ मे ते १५ जूनदरम्यान अर्ज करावा. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती प्रतिविषय ४०० रुपये भरल्यानंतर मिळतील. त्यानंतर पाच दिवसात फेरमूल्यांकनासाठी अर्ज करता येईल.

विभागीय मंडळनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण ९५.६८
अाैरंगाबाद ९१.७७
लातूर ९१.९३
पुणे ९१.९६
नागपूर ९२.११
मुंबई ९०.११
काेल्हापूर ९२.१३
अमरावती ९२.५०
नाशिक ८८.१३
बातम्या आणखी आहेत...