आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधीच खड्डे, त्यात वाहतूक दुपटीने वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रतापनगर पुलाच्या कामामुळे वळवलेल्या वाहतुकीचा फटका चौसर ते ज्योतीनगर रस्त्याला बसला असून खड्डय़ांमुळे या रस्त्याची वाट लागली आहे. सहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला हा रस्ता आता नवीन करण्याशिवाय पर्याय उरला नसला तरी निधी आणि प्रस्तावाअभावी केवळ पॅचवर्कवर भागवावे लागणार आहे. तेदेखील पावसाळ्यानंतर केले जाणार आहे.

शहानूरमियाँ दर्गा रोड ते पीरबाजार या रस्त्यावरील चौसरपासून ज्योतीनगरातून जाणारा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. सहा वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्याची आता पुरती चाळणी झाली असून चौसर ते ज्योतीनगर चौक ते मुथियान कॉर्नर असा हा रस्ता आता वाहतुकीच्या दृष्टीने बाद झाल्यातच जमा झाला आहे.

वाहतूक दुप्पट वाढली

गेल्या पाच महिन्यांपासून या रस्त्यावरची वाहतूक दुप्पट झाली. त्याला कारण ठरले ते प्रतापनगर पुलाचे बांधकाम. दर्गा ते पीरबाजार या मार्गावरची वाहतूक भाजीवाली बाई ते मुथियान कॉर्नर ते चौसर अशी वळवण्यात आल्याने या रस्त्यावरचा भार दुपटीने वाढला. कामगारांना घेऊन जाणार्‍या बसेस, ट्रक, स्कूल बस, शिवाय चारचाकी मोटारी, रिक्षा आणि दुचाकी यांची संख्या दुपटीने वाढल्याने आधीच वाईट अवस्थेत असलेल्या या रस्त्यावर पाच- दहा फुटांचा चांगला भाग सोडल्यास सव्वा किलोमीटरच्या अंतरात फक्त खड्डेच आहेत.

मुलांचे फिरणे बंद झाले
हा संपूर्ण निवासी आणि उच्चभ्रू वसाहतींचा परिसर आहे. परिणामी चारचाकी वाहनांची संख्याही मोठी आहे. शिवाय या मार्गावरून शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाकडे रोज जाणार्‍यांची संख्याही मोठी आहे. एरवी अडीच ते तीन हजार वाहने दररोज या रस्त्याने जायची. आता ही संख्या सात हजारांच्या पुढे गेली आहे. परिणामी रस्त्याने जीव सोडल्यातच जमा झाले आहे. चौसर ते ज्योतीनगर चौक या मार्गावरील खड्डय़ांनी लांबी आणि रुंदीत सगळा रस्ताच व्यापला आहे. या खड्डय़ांमुळे या परिसरातील नागरिकांनी आपल्या मुलांना सायकलीवरून जाण्यावर बंदीच घातली आहे. अपघातांचा धोका वाढला आहे.

पूल पण रखडला : सहकारनगर चौक ते मुथियान कॉर्नर हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा होणार आहे. सोमवारच्या अंकात सहकारनगर ते ज्योतीनगर रस्त्याच्या कामाचा उल्लेख आहे, त्यात हा रस्ता येतो. पण समांतरच्या खोड्यामुळे तो पण अडकला आहे. त्यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दशमेश महादेव मंदिराजवळील पूल होणेही रखडले आहे. ज्योतीनगर चौक ते मुथियान कॉर्नर हा साधारण चारशे मीटरचा रस्ता असून शहरातील अत्यंत वाईट रस्त्यांपैकी एक अशी त्याची अवस्था बनली आहे. सध्या या संपूर्ण रस्त्यावर फक्त महाकाय खड्डे आहेत.

पावसाळ्य़ानंतर पॅचवर्क
पावसाळ्य़ात डांबराचा वापर करून खड्डे बुजवणे शक्य नसल्याने वेट मिक्स वापरून ते तात्पुरते बुजवण्यात येत आहेत. पॅचवर्कचे काम सुरू झाल्यावर या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जाईल.
व्ही. जी. वझे, उपअभियंता, वॉर्ड फ

लवकरच काम सुरू होईल
माझ्या वॉर्डात मुथियान कॉर्नर ते दशमेशनगर चौक एवढा भाग येतो. हा रस्ता काँक्रिटीकरणातून होणार आहे. दीड वर्षांपूर्वी त्याचे भूमिपूजनही झाले आहे. जलवाहिनी हलवण्याचे काम झाले नसल्याने काम सुरूझालेले नाही. रेणुकादास वैद्य, नगरसेवक, र्शेयनगर

खड्डे बुजवणे सुरू
ज्योतीनगर चौक ते चौसर या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. त्याचा परिणाम रस्ता लवकर खराब होण्यात झाला आहे हे काही प्रमाणात खरे आहे. या रस्त्याचे पॅचवर्क लवकरच सुरू करण्यात येणार असून सध्या खड्डे बुजवण्याचे तात्पुरते काम सुरू आहे. - गिरीजाराम हाळनोर, नगरसेवक,ज्योतीनगर