आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपुऱ्या निधीअभावी और्ंगाबादमधील रस्त्यांची कामे बंद; मनपाच्या करचुकव्यांना शोधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा क्षेत्रातील रस्त्यांच्या विकासाची कामे अपुऱ्या निधीमुळे रखडल्याचे मनपाच्या विशेष वकिलांनी हायकोर्टात निदर्शनास आणून दिले. यावर औरंगाबाद हायकोर्टाचे न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. ए. एम. बदर यांनी मनपाच्या कराचा भरणा न करणाऱ्या तसेच कर चुकवेगिरी करणाऱ्या मालमत्ताधारकांचा शोध घेण्याचे आदेश दिले. यासंबंधी मनपाच्या उत्पन्नासंबंधी पुढील आठवड्यात शपथपत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.

अॅड. रूपेश जैस्वाल यांनी शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारी पार्टी इन पर्सन याचिका दाखल केली होती. याचिका मंगळवारी सुनावणीस निघाली. त्या वेळी रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. फेब्रुवारी २०१४ मध्ये रस्त्यांच्या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. मनपाच्या वतीने शहरातील रस्त्यांची कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे सांगण्यात आले. मनपाच्या वतीने विशेष वकील राजेंद्र देशमुख सांगितले की, मनपाला शंभर कोटी रुपये कराच्या रूपाने मिळतात.
पॅचवर्कचा अहवाल सादर
सार्वजनिक बांधकाम विभागाने पॅचवर्क केलेल्या कामाचा अहवाल छायाचित्रांसह हायकोर्टात सादर केला. सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखालील खड्डे बुजवल्याचे दोन फोटो सादर केले. याशिवाय सिडको बसस्थानक चौक व वोक्हार्ट चौकातील प्रत्येकी दोन फोटो हायकोर्टात सादर केले.
२० कोटी जमा होतील
मनपाने कर न भरणाऱ्या १५ हजार व्यावसायिक मालमत्तांची यादी केली आहे. कारवाई करून वसुली केली तर तिजोरीत किमान २० कोटी रुपये जमा होतील. सर्वांना नोटिसा दिल्या आहेत. काही ग्राहक असे आहेत की ज्यांची मालमत्ता कराबाबत कोर्टात प्रकरणे आहेत. जवळपास दोन कोटी रुपयांचा कर या मालमत्तांकडे आहे, अशी माहिती मुख्य करनिर्धारक शिवाजी झनझन यांनी दिली.