आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहदारीच्या रस्त्यावर मातीचे ढीग पाच महिन्यांपासून ‘जैसे थे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक 88 जयविश्वभारती कॉलनीअंतर्गत येणार्‍या राजगुरुनगरात पाच महिन्यांपासून रहदारीच्या रस्त्यात मातीचे ढिगारे आणून टाकण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना बीड बायपास रोडला जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने मातीचे ढीग येथे आणले होते. मात्र, जेसीबी लावून माती ढिगार्‍यांचे सपाटीकरण करण्यात आलेले नाही. ऐन पावसाळ्यात नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता राहिला नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत.
राजगुरुनगरात भररस्त्यावर मातीचे ढीग टाकले आहेत. पावसामुळे रस्त्यावर चिखल तयार झाला असल्याने विद्यार्थी, नागरिकांना जाण्या-येण्यासाठी त्रास होत आहे. चिखलात पाय फसून पडण्याचे प्रकार वाढत आहेत. रस्ता खराब असल्याने नागरिकांना रेल्वे रुळाकडून जैन इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूने यावे लागत आहे. या भागात मनपाचे सफाई कर्मचारी येत नाहीत तसेच कचरा नेण्यासाठी घंटागाडीसुद्धा येत नाही. मातीच्या ढिगार्‍यालगत कचर्‍याचे ढिगारे साचलेले आहेत. यामुळे दुर्गंधी वाढली आहे. या परिसरात घंटागाडीची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी शशिकांत सूर्यवंशी, रमेश तिवारी, प्रताप पाटील, नीलिमा सूर्यवंशी यांनी केली आहे.
पाच महिन्यांपासून रस्त्यावर मातीचे ढिगारे असल्यामुळे आम्हाला रस्ता राहिलेला नाही. नगरसेवकही काही करत नाहीत.
शशिकांत सूर्यवंशी, रहिवासी
वॉर्डात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नाही. मातीचे रस्ते असल्याने चिखलातून वाट शोधावी लागत आहे. आम्ही या सर्व त्रासाला वैतागलो आहोत.
नीलिमा सूर्यवंशी, रहिवासी
बीड बायपासला जाण्यासाठी चांगला रस्ता होता, परंतु रस्त्यावर मातीचे ढिगारे टाकल्यामुळे रस्ता बंद झाला आहे.
रमेश तिवारी, रहिवासी

रस्त्याच्या अडचणीमुळे शाळेतील मुले, वयोवृद्धांना जाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मनपाने आम्हाला रस्ता करून द्यावा.
प्रताप पाटील, रहिवासी