आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत खासगी बसमालकांना दणका; आरटीओची तीन वर्षांतील मोठी कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परमिटचे नूतनीकरण न करणार्‍या व प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी कोंबणार्‍या खासगी बसचालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी धडक मोहीम सुरू केली. पहाटे साडेतीन ते सकाळी साडेदहा वाजेदरम्यान औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर 90 बसेसवर कारवाई करत 9 बस जप्त करण्यात आल्या. यात सुमारे चार लाखांचा दंड वसूल झाला आहे. गेल्या तीन वर्षांतील खासगी बसचालकांविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पुणे, मुंबई, अकोला, नागपूर या मार्गावरील ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले जाते, परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. ही बाब लक्षात घेऊन परिवहन अधिकार्‍यांनी जम्बो मोहीम राबवली. कारवाईदरम्यान अनेक खासगी ट्रव्हल्सने नियमानुसार कर न भरल्याचे लक्षात आले, तर अनेकांनी परमिटचे नूतनीकरण केले नव्हते. परवानगीपेक्षा अधिक बोजा घेऊन जाणार्‍या ट्रकचालकांनाही या वेळी दंड आकारण्यात आला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांच्या आदेशाने व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जालन्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यासाठी नेमलेल्या विशेष पथकात मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग, संदीप मुरकुटे, जमील तडवी आणि आर.बी. बंडगर यांच्यासह चार विशेष कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

या नियमांची पूर्तता आवश्यक
>वाहनाची कागदपत्रे, परवाना जवळ बाळगावा
>मोटार वाहन कर भरणे आवश्यक
>वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट हवे
>परवानगी एवढेच प्रवासी असावेत
>बस चालक आणि सेवक प्रशिक्षित असावा

पवारांनी दाखवली ‘पॉवर’
खासगी बस व अवैध वाहतुकीविरुद्ध गेल्या दोन वर्षांत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठी कारवाई झाली नव्हती. डॉ. डी.टी. पवार यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर धडक कारवाईला गती मिळाली आहे. त्यांनी शहरातील ऑटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती केली. तसेच परवाना नसणार्‍या एक हजार रिक्षांवर कारवाई केली. सध्या नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणार्‍या बसवरही कारवाईस त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे लातूर आणि औरंगाबाद कार्यालयाची जबाबदारी आहे. या अगोदर त्यांनी कोल्हापूर, पुणे येथे सेवा बजावली.

कारवाई सुरूच राहील
प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही. बसचालक व मालकावर शेकडो प्रवाशांची जबाबदारी असते. वाहने नियमाप्रमाणे चालेपर्यंत कारवाई सुरूच राहील.
-डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

कारवाईत सातत्य हवे
कारवाई अचानक सुरू झाली. नियमात व्यवसाय करणार्‍या ट्रॅव्हल मालकांना याचा फरक पडणार नाही. प्रवाशांच्या सुविधेसाठी परिवहन कार्यालयाने यात सातत्य ठेवावे. तरच प्रवाशांची सुरक्षितता कायम राहील.
-राजन हौजवाला, सचिव, ट्रॅव्हल्स असोसिएशन.