आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम-पासपोर्ट सेवा: ग्रामीण पोलिसांची नवी प्रणाली; एक क्लिकवर पूर्ण पासपोर्ट प्रक्रिया, शहर मागेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पासपोर्ट काढायचा म्हटले की अर्जदारांना पासपोर्ट कार्यालय, पोलिस मुख्यालय ते पोलिस ठाणे असे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे अर्जदारासह पोलिस कर्मचाऱ्यांसमोरही पासपोर्ट काढलेला बरा, अशी स्थिती निर्माण होते. ती बदलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी शहर पोलिसांच्या एक पाऊल पुढे टाकत एम-पासपोर्ट ही प्रणाली सुरू केली आहे. त्याद्वारे पासपोर्टसाठीची चारित्र्य पडताळणी ग्रामीण पोलिस अर्जदाराच्या घरी जाऊन टॅबद्वारे पूर्ण करणार आहेत.
 
विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दोन महिन्यांपासून या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला होता. औरंगाबाद परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी यासाठी प्रयत्न सुरू करून आठ दिवसांपूर्वी या प्रक्रियेस प्रारंभ केला. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यांत एम-पासपोर्ट सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी सर्व पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक टॅब पुरवण्यात आला. त्याद्वारे पोलिस ठाण्यांतील गोपनीय शाखेचे कर्मचारी पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची चारित्र्य पडताळणी थेट अर्जदाराच्या घरी जाऊन पूर्ण करतील. त्यामुळे चारित्र्य पडताळणीसाठी पोलिस ठाणे आणि अधीक्षक कार्यालयात अर्जदाराला चकराही माराव्या लागणार नाहीत. विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे पोलिस नाईक राठोड यांनी सर्व पोलिस ठाण्यांत ही प्रणाली सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले.
 
पासपोर्टसाठी १५ दिवस अपेक्षित तरी दीड महिला लागला : नुकतेच पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या शहरातील एका अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार, महिना उलटूनही पोलिस ठाण्यांमधून कॉल आला नाही. शेवटी त्याने स्वत:च ठाण्यात जाऊन विचारणा केली. त्यानंतर घरी येऊन पडताळणी करू, असे सांगण्यात आले. या सर्व प्रक्रियेला जास्तीत जास्त पंधरा दिवस अपेक्षित असताना त्याला दीड महिना लागला.

अशी आहे एम-पासपोर्ट प्रणाली
- दिल्लीतील पासपोर्ट कार्यालयाशी ही प्रक्रिया जोडलेली आहे
- अर्जदारानेस्थानिक पासपोर्ट कार्यालयात अर्ज केल्यानंतर ग्रामीण भागातील सर्व अर्जदारांची माहिती एका लिंकमध्ये दिले जाते
- त्यातीलपोलिस ठाणेनिहाय अर्जदारांची यादी ठाण्यातील कर्मचारी तयार करतील
- विशेष शाखेचे कर्मचारी टॅबसह अर्जदाराच्या घरी जातील
- या पोलिसांकडे एम-पासपोर्ट प्रणालीअंतर्गत आयडी पासवर्ड असेल
- पोर्टलवरलॉग इन करून अर्जदाराच्या कागदपत्रांची शहानिशा करून ते टॅबद्वारे स्कॅन केले जातील
- ऑनलाइन फॉर्मसोबत कागदपत्रांची स्कॅन कॉपी पासपोर्ट कार्यालयाला पाठवली जाईल.
 
शहर पोलिस अवलंबतात जुनीच पद्धत
ग्रामीण पोलिसांनी ही सुविधा सुरू केली असताना शहर पोलिसांकडून पासपोर्टसाठी जुनी पद्धत अवलंबली जात आहे. अर्जदाराने पासपोर्ट कार्यालयात अर्ज कागदपत्रे दिल्यानंतर ती फाइल पोलिस आयुक्तालयात पाठवली जाते. पुढे ही फाइल संबंधित पोलिस ठाण्याकडे पोहोचते. चारित्र्य पडताळणीसाठी ठाण्यातील पासपोर्ट विभागातर्फे अर्जदाराला बोलावले जाते. चारित्र्यासह निवासस्थानाची पडताळणी करून फाइल पोलिस आयुक्तालयात पाठवली जाते. त्यानंतर ती फाइल पासपोर्टच्या मुख्य कार्यालयात रवाना केली जाते.
 
घरपाेच सुविधा
ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीही वाहतूक नियमनसंदर्भात दंडाची रक्कम प्रणाली स्वॅप यंत्राद्वारे वसूल करणे सुरू करत तंत्रज्ञान आधारित पोलिसिंगच्या दृष्टीने पाऊल टाकले. त्यानंतर काही महिन्यांतच एम-पासपोर्ट प्रणाली सुरू केली. त्यात पोलिस कर्मचाऱ्यांना टॅबसह अन्य अॅप्लिकेशन्स पुरवले असून हे कर्मचारी नागरिकांना घरपोच सुविधा देणार आहेत.
 
१५ ठाण्यांत दिले टॅब
औरंगाबादपरिक्षेत्रात एकूण २३ पोलिस ठाणी आहेत. त्यापैकी ३१ ऑक्टोबर रोजी १५ पोलिस ठाण्यांत टॅबचे वाटप करून सुविधेला प्रारंभही झाला आहे. उर्वरित सात पोलिस ठाण्यांतही दोन दिवसांतही प्रणाली सुरू होईल, अशी माहिती निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली.
 
अशी होती आधीची प्रक्रिया
पूर्वी पासपोर्ट कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदाराला आधी अधीक्षक कार्यालय आणि नंतर त्याच्या घराजवळील पोलिस ठाण्यात जावे लागत असे. यात जवळपास १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत होता. विशेष म्हणजे कागदपत्रांमुळे उडणारा कर्मचाऱ्यांचा आणि ती जमवण्यासाठी अर्जदाराला करावी लागणारी धावपळ यातून उडणारा गोंधळ जास्त त्रासदायक होता.
बातम्या आणखी आहेत...