आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा नगर परिषद देवळाईसहच; जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सातारा नगर परिषदेत देवळाईचा समावेश करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव सातारा ग्रामपंचायतीने केला असला तरी शहरालगत होणारी नवीन नगर परिषद ही देवळाईसह असेल, असे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या नगर परिषदेचा प्रस्ताव मुंबईला पाठवला नव्हता. आता तो देवळाईसह जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.

सातार्‍याची लोकसंख्या 50 हजारांपर्यंत पोहोचली असून, त्याच्या बाजूलाच असलेल्या देवळाईची लोकसंख्या 20 हजार आहे. देवळाईचा समावेश सातारा नगर परिषदेत करावा, असा प्रस्ताव देवळाई ग्रामपंचायतीने घेतला होता. त्याला पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांचाही पाठिंबा आहे. तरीही देवळाई आमच्यात नको, अशी भूमिका सातारा ग्रामपंचायतीने घेतली आहे. नियोजन करणे सोपे जाईल म्हणून देवळाईचा समावेश सातार्‍यात करा, अशी आमची मागणी असल्याचे देवळाईचे सरपंच करीम पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने देवळाईसह आणि देवळाईशिवाय सातारा नगर परिषद असे दोन प्रस्ताव तयार करून ठेवले आहेत. पुढील आठवड्यात हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला जाणार असून, देवळाईचा समावेश करायचा की नाही, यावर चर्चा सुरू असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले. नियोजन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी संयुक्त नगर परिषेचा विचार होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही नगर परिषद संयुक्त होण्याची शक्यता जास्त आहे.