आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षम्य दुर्लक्ष, वैभवशाली दीपमाळ कोसळण्याच्या मार्गावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साताऱ्यातील खंडोबाच्या मंदिराची दरवर्षी पडझड होत आहे. शुक्रवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास प्रवेशद्वाराजवळील दीपमाळेचा वरचा भाग कोसळला. या दीपमाळेवर पूर्वी १०० दिवे होते. आता त्यातील केवळ ३० ते ३५ उरले आहेत. जाज्वल्य इतिहास सांगणारा वैभवशाली वारसा नाहीसा होत असताना पुरातत्त्व खाते मात्र यावर उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.

दीपमाळेचा पूर्व उत्तर दिशेचा भाग थेट मंदिराच्या प्रवेशद्वारावरच येऊन पडला. दीपमाळेच्या वरचा भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. शिवाय त्यावर अनेक रोपटी उगवली आहेत. मंदिर व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेशद्वार बंद केले अाहे. पडझड रोखण्याऐवजी आज प्रवेशद्वार बंद केले, उद्या देवदर्शनही बंद करणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
मंदिराच्या संवर्धनाबद्दल अनेकदा पुरातत्त्व खात्याला मंदिर देवस्थानाकडून निवेदन पाठवण्यात आले; पण त्याची दखल घेण्यात आली नाही. मागील वर्षी मंिदराच्या ओट्याचा काही भाग पडला होता. पूर्वी दीपमाळेचा भाग पडल्यानंतर त्या वेळेस पुरातत्त्व खात्याला कळवण्यात आले होते. मंदिराची सर्व जबाबदारी पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा डागडुजी करता येत नाही. पुरातत्त्व खात्याचे अधिकारी जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत मुख्य दरवाजा बंद ठेवू अखेरीस आम्हीच दुरुस्ती करू, असे साहेबराव पळसकर, सोमनाथ शिराणे, गोविंद चोपडे, मोहन पवार, दिलीप धुमाकर, मोहन काळे यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या खंडोबाच्या मंदिरानंतर राज्यातील खंडोबाचे हे दुसरे मोठे मंदिर आहे. मंदिराच्या उभारणीविषयी नक्की माहिती नसली तरी इसवी सन १६३२ मध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले. अहिल्याबाई होळकरांनी या मंिदराचा जीर्णोद्धार केला. पूर्वी सातारा गावातील डोंगरावरच खंडोबाचे मंदिर होते. नंतर ते खाली वसवण्यात आले. डोंगरावरही तत्कालीन खडकात बांधण्यात आलेला गाभारा घोड्यावर विराजमान खंडोबाची मूर्ती आहे.
मंिदराचा खालचा भाग दगडी, तर वरील भाग विटांचा आहे. शुक्रवार, रविवारी तसेच सुटीच्या काळात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात येथे मोठी जत्रा भरते. लग्न झाल्यानंतर नवदांपत्य खंडोबाच्या दर्शनासाठी येण्याची प्रथा आहे. मंदिराच्या खाली तेवढ्याच आकाराची बारव तयार केलेली आहे.
दीपमाळेचे महत्त्व : दीपमाळ मंदिराचे खरे वैभव. नवस करून इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठीही भाविक दीपमाळेवर दिवा लावतात.
पुनर्वैभव शक्य
दीपमाळेच्या दुरुस्तीसंदर्भात तज्ज्ञांकडे विचारणा केली असता वरच्या बाजूचे दोन टप्पे काढून तेथे नव्याने त्याच दगडात दीपमाळ करता येऊ शकते. यावर इपोक्सी रेझिम कोटिंग करूनही उर्वरित भाग पडण्यापासून रोखता येऊ शकतो. तसेच दीपमाळेचा एक भाग पडला असेल तर तेथे त्या प्रकारचा दगड वापरून पुनर्वैभव प्राप्त करून देणे शक्य आहे. वेरूळ, गोदावरी पूल तसेच लोणार येथे अशा प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, असे इंडियन आर्किटेक्ट असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष आर्किटेक्ट सुनील भाले म्हणाले.
राजकारणी केवळ दर्शनापुरतेच
मंदिरात अनेक राजकारणी केवळ दर्शनापुरतेच येतात. जत्रेच्या वेळी खासदार, आमदार, महापौर इतर पदाधिकारी आवर्जून येतात; परंतु मंदिराची होत असलेली पडझड थांबवण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

लवकरच निर्णय घेऊ
- खंडोबा मंदिरासंदर्भात शासनाकडे मागील आठवड्यात विविध कामांचे अंदाजपत्रक पाठवण्यात आले आहे. सोमवारी खात्याचे अधिकारी मंदिराची पाहणी करतील. त्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
एम. व्ही. साखरे, उपआवेक्षक, पुरातत्त्व विभाग
बातम्या आणखी आहेत...