आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरापासून पाठय़पुस्तकांविनाच भरतेय शाळा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. शिक्षण विभाग आणि बालभारतीच्या वादात विद्यार्थ्यांची फरपट होत असून महिनाभरापासून पुस्तकांविनाच शाळा भरत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विभागाने 17 जूनला मोठय़ा दिमाखात पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रत्यक्षात जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये पहिली आणि दुसरीचे मराठी, इंग्रजी, गणित या विषयाची पुस्तकेच उपलब्ध करण्यात आली नाहीत. पुस्तकेच नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत बालभारतीच्या अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी पुस्तके पाठवण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असल्याचे सांगितले. तर, बालभारतीच्या कार्यालयात गेल्यानंतरही पुस्तके दिली जात नसल्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. बालभारती आणि शिक्षण विभागाच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

शिक्षणाधिकार्‍यांचे प्रयत्न कमी
सर्व पुस्तके तयार आहेत. एक, दोन दिवसांत मिळतील. बालभारतीने आपली जबाबदारी पूर्ण केली. मात्र, शिक्षणाधिकार्‍यांनी तालुक्यात पुस्तके पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. वाहतूक समस्यादेखील आहे.
-भागवत पुरी, व्यवस्थापक, बालभारती.

एकही पुस्तक मिळाले नाही
मागील सहा दिवसांपासून आमचे कर्मचारी बालभारती कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, त्यांना एकही पुस्तक देण्यात आलेले नाही. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच पाठ्यपुस्तकांसाठी पाठपुरावा केला जात आहे.
-नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

काय करावे तेच कळत नाही ?
मुलगी महिनाभरापासून शाळेत जात आहे. पुस्तके नसल्याने शाळेत काय शिकवतात ते माहिती नाही आणि घरी अभ्यास घ्यावा तर पुस्तके नाहीत. अशा परिस्थितीत काय करावे ते कळत नाही.
- सारिका जोशी, पालक, हडको एन-12.