औरंगाबाद: सनई चौघड्यांचे सूर, मराठमोळी तुतारी, अस्सल महाराष्ट्रीयन फेटा अन् रेड कार्पेटचा थाट अशा मंगलमयी वातावरणात गुरुवारी बच्चे कंपनींने शाळेत प्रवेश केला. प्रवेशद्वारातच डोरेमॉन,डोनॉल्ड डक पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. अशा उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सवाचा आगळा वेगळा सोहळा शहरातील विविध शाळांत रंगला.
विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी. शाळेत येण्यासाठी उत्सुकत्ता निर्माण व्हावी, या उद्देशाने चार वर्षांपासून शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. हवीहवीशी सुटी संपल्यामुळे पाणावल्या डोळ्यांनी शाळेत प्रवेश करणारी मुले डोरेमॉन, डोनॉल्ड डक, मिकी माऊस असे सवंगडी पाहून हरखली. काही चुकले की रागवणाऱ्या बाई औक्षण करून मुलांना वर्गात पाठवत होत्या. शाळेतील हे वातावरण पाहून मुलांना सोडवण्यासाठी आलेल्या पालकांनाही पुन्हा शालेय जीवनाचा अनुभव घेण्याचा मोह होत आहे, अशी भावना व्यक्त केली. प्रसंगी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. काही शाळांत साक्षरतेचा जागर करत रंगीबेरंगी फुलांचे तोरण, पाकळ्यांची उधळण आणि प्रवेशद्वारात सजलेली रांगोळी होती.
पारंपरिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांना कुठे बैलगाडी, कुठे ट्रॅक्टर तर कुठे पाठ्यपुस्तकात रंगवण्यात आलेल्या परिकथेप्रमाणे मिरवणूक काढून वाजत गाजत वर्गात आणण्यात आले. विनायकराव पाटील प्राथमिक शाळा, खोडेगाव,सोनामाता विद्यालय, वंदे मातरम बालक मंदिर,प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, महानगरपालिका केंद्रीय माध्यमिक विद्यालय मयूरबन कॉलनी, कलावती चव्हाण हायस्कूल, सोनामाता विद्यालय या शाळांत हा सोहळा रंगला.
राधाकृष्ण प्राथमिक, माध्यमिक शाळा : जयभवानीनगर एन-4 सिडको येथील राधाकृष्ण प्राथमिक माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रभातफेरीनंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डी. व्ही. अंकमुळे, एस.डी. अंकमुळे, एस. आर. गादीमोड, जी. के. हरकळ यांची उपस्थिती होती.
संस्कार प्रबोधिनी प्रशाला : शिवशंकर कॉलनीतील संस्कार प्रबोधिनी प्रशालेत सुशोभित वाहनांतून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. या वेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका सविता कुलकर्णी, सुभाष पाटील, प्रमोद लालसरे, नीळकंठ गुरुजी, नकुल बाविस्कर यांची उपस्थिती होती.
खोडेगाव जि.प.शाळा : बँडबाजाच्या तालावर घोडा, बैलगाडी, ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख, डॉ.सुभाष कांबळे, रमेश ठाकूर, राकेश साळूंके यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.