आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Senior Citizens Laid Siege To Samantar Officer

ज्येष्ठांचाही उडाला भडका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतरकडून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने आतापर्यंत पक्षाचे अधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. मात्र बुधवारी शहरातील अडीचशे ज्येष्ठ नागरिकांचाही संयम सुटला आणि त्यांनी बुधवारी सकाळीच एन-१ मधील समांतर कार्यालयावर चाल करून अधिकाऱ्यांना घेराव घातला.
या भागात एकही अवैध नळ कनेक्शन नाही. येथील रहिवासी नियमित पाणीपट्टी भरतात. या भागातील पाइपलाइनदेखील खराब नाही. असे असतानाही परिसरासाठी मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याची सातत्याने आेरड होत असते. वाॅर्डाचे नगरसेवक राजू शिंदे यांनी समांतरच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या; पण प्रश्न सुटला नाही. उलट दोन दिवसांआड येणारे पाणी थेट पाच-सहा दिवसांनंतर सोडण्याचे प्रकार घडू लागले. यामुळे नागरिक वैतागले. त्यांनी समांतरचा समाचार घेण्याचे ठरवले आणि अधिकाऱ्यांना घेराव घातला. काही जण अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. या वेळी समांतरचे अधिकारी व्ही. बी. शिवांगी, संजय काळदाते हजर होते. तुमच्यापेक्षा महानगरपालिकेच्या वतीने चांगला पुरवठा केला जात होता, असे काही जण म्हणाले. १५ दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही कायद्याने समांतरच्या विरोधात लढा देऊ, असा इशारा देण्यात आला. या वेळी नगरसेवक राजू शिंदे, अजय पाथ्रीकर, संजय बोगडे, हास्य क्लबचे अध्यक्ष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मीटरलाही विरोध
समांतरच्या ठेकेदाराकडून नळजोडणीला मीटर लावून घेण्यासही ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. बायजीपुरा येथील संघटनेने महापौर त्र्यंबक तुपे तसेच समांतरच्या व्यवस्थापनाला दोन आठवड्यांपूर्वी निवेदन दिले. त्यात मीटर लावल्यावर पाणी येत नाही. म्हणून आधी मुबलक पाणी द्या, मगच मीटर लावा, असे म्हटले होते. श्रीनगर गारखेडा येथेही ज्येष्ठांच्या संघटनेची मोठी बैठक झाली. पाणीटंचाईमुळे आम्ही सारे हैराण झालो आहोत. महिन्यातून जेमतेम ४-५ दिवस, तेही अत्यल्प पाणी मिळते. तरी मीटरची सक्ती कशासाठी, असा सवाल सभापती दिलीप थोरात यांच्याकडे केला होता.