आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटतट नाही, पण तुम्ही गटतट सोडा, औरंगाबाद शिवसेना शाखा वर्धापन दिन सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या शिवसेना शाखेचा ३१ वा वर्धापन दिन बुधवारी शहरात उत्साहात साजरा झाला. या वेळी सेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यापासून सर्वच वक्त्यांनी आधी पक्षात मतभेद अन् गटबाजी नसल्याचे सांगितले, तर दुसरीकडे आता गटतट सोडून एकत्र येण्याचे आवाहनही केले. त्यामुळे ३२ व्या वर्षात प्रवेश करताना या पक्षासमोर गटबाजीचे मोठे आव्हान असल्याचे दिसून आले.
सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यास संजय राऊत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संदिपान भुमरे, संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, आर. एम. वाणी, महापौर त्र्यंबक तुपे, सभापती मोहन मेघावाले, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, नरेंद्र त्रिवेदी उपस्थित होते.

प्रस्ताविकात जिल्हाप्रमुख दानवे यांनी शिवसेनेने केलेल्या कामाचा आढावा घेतला. आमदार शिरसाट म्हणाले की, आपल्या पक्षात चमच्यांची भरती होऊ लागली आहे. कोण कोणाच्या जवळचा, कोणामुळे आपल्याला लवकर ‘लिफ्ट’ मिळेल याची काळजी घेण्यात येत आहे. ज्यांनी येथे शिवसेना उभी केली त्यांना आपण विसरलो की काय, असे चित्र आहे. जर आपण निष्ठावानांना विसरलो तर भविष्यात लोकही आपल्याला विसरून जातील.

हाच धागा पकडून घोसाळकर म्हणाले, गेल्या ३१ वर्षांत शिवसेनेने तुम्हाला खूप काही दिले आहे. आता लोकांना देण्याची वेळ आहे. सध्या काँग्रेस लटपटतेय, राष्ट्रवादी गोंधळलेली आहे, भाजपमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत शिवसेना हाच एकमेव पर्याय आहे. तेव्हा कोण मोठे-कोण लहान या वादात अडकता सर्वांनी एकत्र येऊन पक्षाचे काम करण्याची गरज आहे.
खैरे यांच्या भाषणाची सुरुवातच ‘एकाला सभापतिपद दिले नाही तर तो कार्यक्रमालाच येत नाही म्हणाला’ अशी झाली. काही कार्यकर्ते माझ्या कानात काही सांगतात, नंतर दानवेंचे कान भरतात. पुन्हा पालकमंत्र्यांकडे जाऊन काहीतरी वेगळेच सांगतात. आपल्यात भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे. सर्वप्रथम आपण भांडण लावणाऱ्यांना दूर ठेवू. खैरे म्हणाले, ‘माझा कोणताही गट नाही. मी कोणी नेताही नाही. मी तुमचा मोठा भाऊ आहे. काही चुकत असेल तर वडिलकीच्या नात्याने लगेच विसरले पाहिजे. रुसवेफुगवे चालत असतात,’ अशा शब्दांत खैरे यांनीही सर्व काही आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

राऊत यांनी रुसव्याफुगव्यांचा धागा पकडला. शिरसाट यांचा उल्लेख ‘मराठवाड्याची मुलूखमैदानी तोफ’ असा सूत्रसंचालक वैद्य यांनी केला होता. तो संदर्भ देत राऊत म्हणाले, ‘आपल्याकडे खूप तोफा आहेत, परंतु त्या का रुसतात हे कळत नाही. पुन्हा पेटायला जास्त वेळ घेतात. त्यामुळे त्यांना आग लावावी लागेल अन् दारूगोळा संपला का हेही बघावे लागेल.’ ते म्हणाले, ताकदीपुढे जग झुकते. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. पक्ष राहिला तर गटतट राहतील. आपल्या पक्षात दलाल नाहीत, आहे ते फक्त सैनिक. शिवसैनिकांतील मतभेद हे बुडबुडे आहेत अन् बुडबुडेच ठरावे. खैरे साहेब, ज्येष्ठ म्हणून मतभेद दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही पालक आहात.’ शहरप्रमुख राजू वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.

डॉक्टरांचा सन्मान
शिवसेनेच्या वतीने या वेळी अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या शहरातील रुग्णालयातील डॉक्टरांचाही सन्मान करण्यात आला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, कमलनयन बजाज सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा समावेश आहे.
एव्हरेस्टवीराला 1 लाख रुपये
ग्रामीणपोलिस दलातील जवान एव्हरेस्टवीर शेख रफिक याला या कार्यक्रमात शिवसेनेच्या वतीने रोख लाख रुपये देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यापूर्वीही दिल्लीत खासदार खैरे यांनी त्याला रोख २५ हजारांची मदत केली होती. रफिक याने औरंगाबादची शान वाढवल्याचा उल्लेख या वेळी करण्यात आला. त्याचबरोबर आरती चुंबळे या गंगापूर तालुक्यातील योग शिक्षिकेलाही ७० हजार रुपये रोख देण्यात आले. दहावीतील गुणवंतांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

३५ आमदार हवेत
भाजपकडूनहोत असलेल्या अवहेलनेलाही राऊत यांनी या वेळी हात घातला. ते म्हणाले, आपल्याला अपमान भरून काढायचा आहे. मराठवाड्यातील शिवसेनेमध्ये ती ताकद आहे. येथून ४६ पैकी किमान ३५ आमदार विजयी झाले पाहिजेत. सभागृहाचा वरचा माळा रिकामा होता याचा संदर्भ देऊन ते म्हणाले, ‘पुढील वर्षी वरचा माळा गच्च भरला पाहिजे, इतरांचा असेल पण आपला वरचा मजला मात्र भरलेला असावा’ अशा शब्दांत कमी गर्दी असल्याबद्दल त्यांनी टोलाही लगावला.
बातम्या आणखी आहेत...