आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीत युद्धकलेचे कसब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांची 384 वी जयंती बुधवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. लेझीम, ढोल-ताशांच्या गजराने आसमंत दणाणून सोडला होता. विविध कलाविष्कारांसह हलगीच्या साथीने मिरवणुकीत शिवचैतन्य निर्माण केले. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली.

सिडकोतील राष्ट्रीय विद्यालयाने सादर केलेल्या घोड्यावर बसलेले शिवराय, जिजाऊ आणि मावळ्यांच्या सजीव देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले. कुंभेफळ येथील महारुद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे सादरीकरण केले. यात मानवी मनोरे, विविधतेत एकता आणि तिरंगी झेंड्याचा देखावा सादर केला.

वसीम खान यांच्या ढोल-ताशाने वेगळाच उत्साह भरला होता. शंभुराजे र्मदानी खेळ विकास मंच कोल्हापूर यांनी लाठी काठी, तलवार, पट्टा, दांडपट्टा, भाला आणि कुर्‍हाड इत्यादी हत्यारांचा कलेत वापर करत कौशल्य सादर केले. तसेच धारेश्वर हायस्कूल, हरसिद्धी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनीदेखील मिरवणुकीत सहभाग घेतला.

मान्यवरांची उपस्थिती : या वेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार सतीश चव्हाण, सुभाष झांबड, विक्रम काळे, पोलिस आयुक्त संजय कुमार, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, माजी आमदार नितीन पाटील, माजी मंत्री गंगाधर गाडे, नरेश मेघराजानी, मनमोहनसिंग ओबेरॉय, राधाकृष्ण गायकवाड, मुश्ताक अहेमद, अँड. सय्यद अक्रम, अभिजित देशमुख, प्रमोद राठोड, विनोद पाटील, अनिल मानकापे यांची उपस्थिती होती. शिवनाथ राठी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.