आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या नावावर मते मागण्याची शिवसेनेवर वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आतापर्यंत हक्काने आपल्यासाठी आणि मित्रपक्ष भाजपसाठी मते मागणार्‍या शिवसेनेवर यंदा प्रथमच भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर तसा प्रचार सुरूही केला असून आतापर्यंत मोठय़ा भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेला प्रथमच असे करावे लागत आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच शिवसेना आणि भाजप युतीने औरंगाबादेत अनौपचारिकपणे प्रचाराला प्रारंभ केला आहे. आतापर्यंत औरंगाबादेत शिवसेनेचा प्रचार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच व्हायचा. ठाकरे यांचा करिष्मा आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात होणारी त्यांची जाहीर सभा कायमच शिवसेनेला विजय देऊन गेली आहे. या सगळय़ात मित्रपक्ष भाजप कायम दुय्यमच राहिला. भाजपलाही शिवसेनाप्रमुखांच्या जादूने मदत केल्याने त्यांची स्वत:ची ताकद तयार होऊ शकली नाही. 2009 ची महानगरपालिका निवडणूक याचे चांगले उदाहरण आहे. बाळासाहेब ठाकरे यांची सभा होईपर्यंत शिवसेना-भाजपच्या हातून ही मनपा गेली असेच चित्र होते. जनतेत एवढी नाराजी असतानाही बाळासाहेब ठाकरे यांच्या एका सभेने पुन्हा युतीला सत्तेत आणले.

काळ बदलला : महानगरपालिका असो की लोकसभा, बाळासाहेबांच्या नावाने शिवसेनेने निवडणुका लढल्या; पण यंदा प्रथमच शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांची कमतरता जाणवत आहे. आतापर्यंत मोठय़ा भावासारखी दादागिरी करणार्‍या शिवसेनेला भाजपच्या नेत्यांच्या नावे मते मागावी लागत आहेत. शिवसेनेला आता करिष्मा असलेल्या नरेंद्र मोदींचा आधार वाटत असून त्यांनी लगेच त्यांच्या नावे मते मागणे सुरू केले आहे.

का आली ही स्थिती? : राजकीय अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे म्हणाले की, नेता गेला आणि मुद्दे गेले, अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. खासदार खैरे यांच्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी कोणतेही रचनात्मक आणि संस्थात्मक काम मतदारसंघात उभे केले नाही. खड्डे, रस्ते, पाणी या प्रश्नांवर त्यांना औरंगाबाद शहरात फटका बसणार आहे. खैरे यांनी महानगरपालिकेत ढवळाढवळ करून ही अवस्था आणली आहे. म्हणून शिवसेना आता पुन्हा सुरक्षेच्या नावाखाली हिंदू-मुस्लिम हे आपले जुने कार्ड खेळत आहे.

कर्तृत्वहीन नेत्यांमुळे ही अवस्था
शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जोरावरच मते मागत विजय मिळवले; पण कर्तृत्व दाखवण्यात नेते कमी पडले. त्यांनी काम केले असते, तर त्या जोरावर मते मागता आली असती. आता मोदींचा आधार त्यासाठीच घ्यावा लागत आहे. यापासून शिवसेनेला धडा घ्यावा लागेल. कारण आगामी काळात विधानसभा व नंतर महानगरपालिकेच्या निवडणुकांत जनता विकास कामांचाच प्राधान्याने विचार करणार आहे. सारंग टाकळकर, राजकीय विश्लेषक

ही दुर्दैवी वेळ
शिवसेनेकडे मुद्दे राहिलेले नाहीत. हिंदू- मुस्लिम प्रश्नाचा वापर करून ते पुन्हा आपल्या मतदारसंघात आपले अस्तित्व दाखवून देऊ इच्छित आहेत; पण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी परप्रांतातील नेत्याचा वापर करावा लागणे हे नक्कीच दुर्दैवी आहे. जयदेव डोळे, राजकीय अभ्यासक

मोदींचा गजर
निवडणुका जाहीर व्हायला काही दिवसच बाकी असताना शिवसेनेने अनौपचारिकरीत्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. गेल्या 15 दिवसांत खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत जे जे मेळावे, कार्यक्रम, उद्घाटन सोहळे झाले, त्यात त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असल्याने शिवसेनेला मतदान करा, असे आवाहन करणे सुरू केले आहे. यावरून शिवसेनेने मोदींना हुकमी एक्का केले असल्याचे दिसून येते.