आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Siddharth Gardan Entertainment Tax Issue

‘सिद्धार्थ’ने 55 लाखांचा मनोरंजन कर थकवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यानाच्या तिकीट विक्रीतून दरसाल 80 लाख रुपये कमावणार्‍या मनपाला जिल्हा प्रशासनाने मागील दहा वर्षांची मनोरंजन कराची 55 लाख रुपयांची थकबाकी भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. मनपाने या नोटिसीला उत्तर पाठवत प्राणिसंग्रहालय ही करमणूक नसून तेथे संशोधन व अभ्यासाचेही काम चालते, असे सांगत कर माफ करण्याची विनंती केली आहे. तशा आशयाचे पत्र महसूल खात्यालाही पाठवण्यात आले आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाशेजारचे सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय शहरातील लोकप्रिय उद्यान आहे. त्यातील खेळणी, उद्यान, प्राणिसंग्रहालय, मत्स्य संग्रहालय आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. शहरातील नागरिकांशिवाय शहरातील व शहराबाहेरील शाळांच्या सहलीदेखील येथे येतात. मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असल्याने येथे कायम गर्दी असते. लहान मुलांसाठी 5 रुपये तर मोठय़ांसाठी 10 रुपये असे तिकिटांचे दर आहेत. या उद्यानातून मनपाला दरवर्षी किमान 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या तिकीट विक्रीवरील मनोरंजन कर मनपाने गेल्या 10 वर्षांत भरलेलाच नाही. मनपाने उद्यानावरील मनोरंजन कर माफ करावा, अशी सरकारकडे विनंती केली असून महसूल व वन खात्याला पत्र दिले. प्राणिसंग्रहालय ही करमणूक नाही. येथे संशोधन, अभ्यास व वन्य प्राण्यांचे जतन, संवर्धन केले जाते. शिवाय वन्यजीवांसंदर्भात लोकशिक्षण होते. विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील डीएनए बारकोडिंग प्रयोगशाळा त्याचा वापर करते. पशुवैद्यक अभ्यासक्रम करणार्‍या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप येथे होते. सर्वसामान्यांसाठी शुल्क आकारले जात असले तरी ते करमणूक म्हणून नव्हे तर या संग्रहालयाच्या देखभालीसाठीच त्याचा उपयोग होतो. त्यामुळे मनोरंजन कर आकारणे चुकीचे आहे, असे मनपाने पत्रात म्हटले आहे.
उद्यान तोट्यात
प्राणिसंग्रहालयाच्या माध्यमातून दरवर्षी 80 लाख रुपयांचे उत्पन्न होत असले तरी त्यावर किमान 1 कोटी रुपये खर्च होतो. याचाच अर्थ तोट्यात हे उद्यान चालवले जाते. आम्ही आमची भूमिका मांडणारे उत्तर पाठवले असून मनोरंजन कर माफ करावा, अशी विनंती केली आहे. डॉ. बी. एस. नाईकवाडे, संचालक प्राणिसंग्रहालय