आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ उद्यानाचे शुल्क महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपाच्या एकमेव चांगल्या असलेल्या सिद्धार्थ उद्यानाच्या शुल्क वसुलीचे खासगीकरण करण्यात येत असून त्यातून मनपाला दरवर्षी दीड कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र आगामी काळात ठेकेदाराची गुंतवणूक निघण्यासाठी मनपाला शुल्क वाढवावे लागण्याची शक्यता आहे.

सिद्धार्थ उद्यानातील प्रवेश शुल्क, संगीत कारंजे, मिनी ट्रेन इत्यादी शुल्क वसुलीतून वार्षिक उत्पन्न 1 कोटी 3 लाख रुपये अपेक्षित धरून ते काम खासगी एजन्सीला वार्षिक तत्त्वावर देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. शुक्रवारी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे. उद्यानाची शुल्क वसुली खासगीकरणातून करून ते उत्पन्न शहरातील इतर उद्यानांच्या विकासासाठी वापरता यावे, असा हा मूळ प्रस्ताव तत्कालीन स्थायी समिती सभापती विकास जैन यांच्या काळात मांडण्यात आला होता. या कामासाठी दहा उद्यानांची निवडही करण्यात आली होती. त्याच्या निविदाही निघाल्या होत्या.

गेल्या वर्षी सहा निविदा आल्या होत्या. एक निविदा तांत्रिक कारणाने बाद झाल्यावर पाच निविदा उघडल्यावर सर्वाधिक 1 कोटी 11 लाख 60 हजार रुपयांची बिल्डवेल कन्स्ट्रक्शनची निविदा पात्र ठरली, पण याला ख्वाजा उस्मानोद्दिन या दुसर्‍या क्रमांकावरील ठेकेदाराने न्यायालयात आव्हान दिले होते. जुलै 2013 मध्ये न्यायालयाने फेरनिविदा मागवण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात फेरनिविदा काढण्यात आली. या वेळी मात्र सौदागर एंटरप्रायजेसची एकच निविदा आली व तीही निर्धारित निविदेच्या 35 टक्के अधिक उत्पन्न देणारी आहे.