आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचा लवकरच विस्तार; महापौरांकडून पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाच्या सुधारित आराखड्याला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली असून त्यानुसार आता सिद्धार्थ उद्यान हे पूर्णपणे प्राणिसंग्रहालय म्हणून विकसित केले जाणार आहे. उद्यान आणि खेळणी कायम राहणार असली तरी प्राण्यांसाठी नव्या नियमांनुसार अधिक जागा मिळणार आहे.

प्राणिसंग्रहालयातील आजारी रोहिणी या सिंहिणीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापौर कला ओझा, सभागृह नेते सुशील खेडकर आणि एनडीएचे गटनेते गजानन बारवाल यांना प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी सुधारित आराखडा दाखवत प्राणिसंग्रहालय कसे असेल याची माहिती दिली.

डॉ. नाईकवाडे म्हणाले की, प्राणि-संग्रहालयाबाबतच्या नव्या निर्देशांनुसार प्रत्येक प्राण्याला किती जागा असावी, रचना कशी असावी, या प्राण्यांना संग्रहालय हा कोंडवाडा न वाटता राहण्यायोग्य अधिवास वाटावा यासाठी या नव्या आराखड्यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच सिद्धार्थ उद्यानात पूर्णपणे प्राणिसंग्रहालय राहणार आहे. मात्र उद्यान म्हणून विकसित केलेला भाग तसाच राहणार आहे व खेळणीही राहणार आहेत. फक्त प्राण्यांसाठी अधिकची जागा मिळणार आहे. निर्देशानुसार प्राणिसंग्रहालयासाठी किमान 25 एकर जागा असणे आवश्यक आहे. सिद्धार्थ उद्यान 34 एकरांचे असून त्याची नव्याने रचना केली जाणार आहे.

या संदर्भात सभागृह नेते सुशील खेडकर म्हणाले की, उद्यानाच्या बाजूने जाणार्‍या नाल्याचे पाणी आणि वापरात येणारे पाणी याचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रकल्प उभारला जाणार असून, प्रस्ताव लवकर सर्वसाधारण सभेत सादर करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पशुवैद्यकीय तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची विनंती आयुक्तांना करण्यात आली होती.