आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीत वाहतुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: शहरातील वाहतुकीची स्थिती अत्यंत विदारक आहे. वाहनांची संख्या साडेअकरा लाखांवर पोहोचली आहे. विदेशात सीसीटीव्ही, इंटरनेटद्वारे वाहतूक संचालन केले जाते. त्याच धर्तीवर या स्मार्ट सिटीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, रस्ते विकास, एकाच वेळी सिग्नल लागेल अशी व्यवस्था अद्ययावत करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 
 
शहरात दररोज १९८ नवीन वाहनांची भर पडत आहे. बाहेरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. वाहनचालक शासकीय कर, शुल्काचा भरणा करतात. या बदल्यात त्यांना पक्के रस्ते, सुरळीत वाहतूक व्यवस्था करून देणे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र, याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत अरुंद रस्ते, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने वाहतूक सेवा ठप्प होत आहे. प्रत्येक सिग्नलवर थांबावे लागते. अग्निशमन बंब, रुग्णवाहिका तसेच व्हीआयपी वाहनांना मार्ग मिळत नाही. यामुळे इंधन वेळेचाही अपव्यय होत आहे. 
 
त्रिपाठीयांनी सुचवले उपाय : स्मार्टसिटीतील वाहतूक सेवा कशी शाश्वत होईल याबाबत परिवहन तज्ज्ञ एन. के. त्रिपाठी यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, शहरात एक अद्ययावत केंद्रीय रूम असावी. तेथे मोबाइल अॅप, जीपीएस, इंटरनेट, सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणांवरील वाहतूक स्थिती पाहून दिशानिर्देश देऊन नियंत्रण करायला हवे. चौफुलीवरील वाहतुकीचा अंदाज बांधून सिग्नलची वेळ निश्चित करावी. 
 
एक सिग्नल लागल्यानंतर पुढे दुसऱ्या सिग्नलवर थांबण्याची गरज भासणार नाही, असे नियोजन हवे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात चालान करावे. पार्किंग व्यवस्था असावी तेथील स्थितीची वाहन चालकांना दूरवरच माहिती दिली जावी. कोणत्या मार्गावर वाहतूक ठप्प आहे, किती वेळ राहणार, पर्यायी मार्ग कोणता याची वाहनधारकांना पूर्वसूचना मिळावी.
 
अपघातग्रस्तांना ट्रामा सेंटरपर्यंत तातडीने घेऊन जाण्यासाठी विशेष व्यवस्था असावी. नागरिकांना कायद्यानेच हे अधिकार दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक वाहनधारक शासनाचा कर शुल्क अदा करतो. युरोपीय देशात या सर्व सेवासुविधा उपलब्ध आहेत. तशा सेवा सुविधा उपलब्ध करून देणे शासन प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले. 
 
याचा आहे अभाव : रस्ते अरुंद आहेत. एक सिग्नल लागल्यानंतर दुसरा सिग्नल लागणार नाही, अशी व्यवस्था नाही. त्यामुळे प्रत्येक सिग्नलवर थांबावे लागते. तसेच जागोजागीच्या सिग्नलवर वाहतूक ठप्प होते. एकाच सिग्नलवर दोन वेळा थांबावे लागते. परिणामी इंधन वेळेचा अपव्यय होतो. मानसिक त्रासही होतो. बहुतांश सिग्नलचे टायमर बंद आहेत. वाहतूक स्थिती बघून सिग्नलचा वेळ कमी अधिक करण्याचे काम मोजक्याच सिग्नलवर होते.
 
अपघातग्रस्तांना तातडीने ट्रामा सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही. वाहन चालकांना दूरवर माहिती दिली जात नाही. रुग्णवाहिका, पोलिस व्हॅन, अग्निशमन बंब, व्हीआयपींना कसाबसा मार्ग काढावा लागतो. पार्किंग सेवा काही ठिकाणी आहेत. त्याची माहिती दिली जात नाही. 
 
आपल्याकडे उपलब्ध सेवा 
पोलिस आयुक्तालयात केंद्रीय रूम स्थापन करण्यात आली आहे. काही मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. स्क्रीनवर विविध ठिकाणची वाहतूक स्थिती बघून वाहतूक पोलिसांना निर्देश दिले जातात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० हजार वाहनधारकांना गतवर्षी दंड आकारण्यात आला आहे. वायरलेस, वॉकीटॉकीच्या माध्यमातून वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्याचे काम केले जाते, अशी माहिती वाहतूक शाखेतील सूत्रांनी दिली.