आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'औरंगाबाद स्मार्ट सिटी’च्या पहिल्याच बैठकीत चर्चा हप्तेबाजीचीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबादचा समावेश होण्याची शक्यता निर्माण होताच पुढील नियोजनासाठी अधिकारी, पदाधिकारी गांभीर्यपूर्वक नियोजनाच्या कामाला लागतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात शनिवारी झालेली नियोजनाची पहिली बैठक हप्तेबाजीच्या आरोपांनी गाजली. त्यामुळे योजनेत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक असणारे ५० कोटी रुपये उभे कसे करायचे, यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
स्मार्ट सिटी विकासाची सर्वोत्तम संधी असली तरी नागरी सुविधा, करवसुली नसल्याने ही संधी म्हणजे मोठे आव्हान झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त प्रकाश महाजन यांनी शनिवारी विशेष बैठक आयोजित केली होती. त्यात पहिला मुद्दा ५० कोटी रुपये कुठून उभे करायचे, हाच होता. शिवसेनेचे गटनेते राजू वैद्य यांनी कर भरणा-यांनाच पुन्हा नोटिसा देऊन वसुली वाढवण्याचा उद्योग करू नका, असा सल्ला दिला. साता-यासाठी खासगी संस्था नेमून तेथील मालमत्तांची माहिती घ्या. त्यावर कर लावा, असेही सांगितले. रस्त्यावर कुंड्या, गणेशमूर्ती, मडके तयार करणा-यांकडून आपले कर्मचारी हप्ते घेतात, असा आरोप त्यांनी करताच करवसुली पथकाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी खालचे कर्मचारी पैसे घेत असतील. वरचे अधिकारी घेत नाहीत, असे प्रत्युत्तर दिले.

६० कोटींचा मालमत्ता कर थकला आहे. त्याची वसुली सुरू करतो मात्र, सभागृह नेत्यांनी हस्तक्षेपासाठी कॉल करू नये, असा टोला लगावला. त्यावर संतापलेले सभागृहनेता राजेंद्र जंजाळ म्हणाले की, मी कॉल करतच नाही. तुमच्याकडून वसूली होत नसल्यास मीच मदतीला येतो. १२ वर्षे मी हे काम केले आहे. हा वाद वाढण्याची चिन्हे दिसत असताना महापौरांनी मध्यस्थी करत काटकसरीचा मार्ग अवलंबा. क्रीडा, व्यापारी संकुल तसेच शाळांमध्ये वीज बचत करा, असा सल्ला दिला.

आयुक्तांनी त्यात एलबीटी थकबाकी वसुलीची पुस्ती जोडली. मग उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, विरोधी पक्षनेता जहाँगीर खान, गटनेता भाऊसाहेब जगताप यांनीही सूचनांचा भडिमार केला. अखेर स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अहवालाचे कंत्राटे मुंबईच्या फोर स्ट्रेस संस्थेला दिली. पुढील आठवड्यात पुन्हा वसुली आढावा व ५० कोटींच्या िनयोजनासाठी भेटण्याचे ठरवून बैठक आटोपण्यात आली.

हप्ता वसुलीवरून तू तू मैं मैं
रस्त्यावर कुंड्या, गणेशमूर्ती, मडकी तयार करणा-यांकडून महापालिकेचे कर्मचारी हप्ते घेतात.
- राजू वैद्य,

शिवसेनेचे गटनेते
महापालिकेचे खालचे कर्मचारी हप्ते घेत असतील पण वरचे अधिकारी हप्ते घेत नाहीत.
- शिवाजी झनझन, वसुली पथक प्रमुख