आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूच्या ट्रकने पुन्हा घेतला एकाचा बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड / औरंगाबाद - वाळूच्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोडजवळील भारत पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता हा अपघात घडला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. वाळूच्या ट्रकने दोन दिवसांत दोघांचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माळीवाडा येथील कृष्णा आत्माराम बनकर (26) व भगवान बाबूराव पवार (40) हे दोघे दुचाकीने (एमएच 20 डीजी 557) पाचोडमार्गे अंबडकडे जात होते. पाचोडजवळील भारत पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीस शहागड येथून वाळू घेऊन भरधाव निघालेल्या ट्रकने (एमएच 20 4390) ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण दूरवर फेकले गेले. यात कृष्णा बनकर घटनास्थळीच ठार झाला, तर भगवान पवार हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मोठा जमाव जमला होता, परंतु पोलिसांनी त्यांना दूर केले.

वाहतूक थांबली
पाचोड येथे वाळूच्या ट्रकमुळे अपघात झाल्याची वार्ता वाळूमाफियांच्या एजंटांनी मोबाइलद्वारे फोनाफोनी करताच ओव्हरलोड वाळूची शेकडो वाहने तिकडेच थांबवण्यात आली. संतप्त जमावाच्या तावडीत आपले वाहन बळी पडू नये याकरिता वाळू वाहतूक थांबवण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.