आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत 11 सोनोग्राफी केंद्रांना सील

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नियम मोडणार्‍या गर्भपात केंद्रांसह सोनोग्राफी केंद्रांवर दोन दिवसांत थेट कारवाई करा, या विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत मनपाच्या 9 पथकांनी रात्री 11 सोनोग्राफी केंद्रे व पॅथॉलॉजी केंद्रांना गुरुवारी संध्याकाळी सील ठोकले.

पालिकेचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पथकांना संध्याकाळी यासंबंधी सूचना दिल्या. सातच्या सुमारास पथके बाहेर पडली. प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यात शहरातील सर्व 192 केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. त्रुटी आढळलेल्या 23 केंद्रांपैकी 6 केंद्रे सील करण्यात आली तर 6 केंद्रांमध्ये किरकोळ त्रुटी होत्या. उर्वरित 11 केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु पुढे कारवाई झाली नव्हती.

सील केलेली केंद्रे व रुग्णालये

डॉ. जिल्ला मॅटर्निटी होम-मोतीवालानगर, मालाणी पॅथॉलॉजी लॅब-मिलकॉर्नर, र्शी मॅटर्निटी-चेतनानगर, सुप्रभात हॉस्पिटल-हडको एन-9, शमा मॅटर्निटी होम-खोकडपुरा, सिद्धिविनायक डायग्नोस्टिक सेंटर-सिडको एन-2, सुखदा मुळे सोनोग्राफी क्लिनिक-उस्मानपुरा, प्रभार्शी नर्सिंग होम-रोकडिया हनुमान कॉलनी, कोडलीकेरी हॉस्पिटल-मनजितनगर, जानकी हॉस्पिटल- सिडको एन-5 आणि ज्ञानेश्वर हॉस्पिटल-आकाशवाणी.

पथकाला पाणी देणार्‍या सेवकांना पिटाळले

खोकडपुर्‍यातील शमा मॅटर्निटी होममधील सोनोग्राफी केंद्र सील करण्यासाठी महानगरपालिकेचे पथक सायंकाळी सातच्या सुमारास धडकले. रुग्णालयातील सेवकांनी पथकातील कर्मचार्‍यांसाठी पाणी आणले. ते पाहून डॉ. शमा खान संतप्त झाल्या. त्यांनी ‘आपल्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्यांना पाणी काय पाजता?’ असे म्हणत सेवकांना पिटाळून लावले.

का केली कारवाई ?
सोनोग्राफी केंद्रांत नोंदी नियमानुसार केलेल्या नव्हत्या.
लिंगनिदान फॉर्मवर रुग्णाच्या नातेवाइकांच्या सह्या नव्हत्या.
मनपाने दिलेले फॉर्म अपूर्ण होते.
मनपाने दिलेल्या नोटिसांचे समाधानकारक उत्तर दिले नव्हते.

कारवाईचा निषेध
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजू जिल्ला म्हणाल्या, सोनोग्राफी नाही केली तर जिवाला धोका आहे, असे पेशंट आज माझ्याकडे होते. त्यांची जबाबदारी कोणाची? असा सवाल पेशंटनीच कारवाई करणार्‍यांना विचारला. ज्यांना मूलबाळ होत नाही, त्यांच्यासाठी प्रयत्न करते आहे. सरकारी यंत्रणेला माझ्याविषयी शंका असेल, तर 24 तास माझ्याकडे सामाजिक कार्यकर्ता ठेवावा आणि माझे रेकॉर्ड तपासावे. माझ्याकडे कुठलीच त्रुटी सापडली नसताना झालेल्या कारवाईचा मी धिक्कार करते.