आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिक्षा बंद:सिटी बसने कमावले १.७५ लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांकडून जाच होत असल्याचा आरोप करत औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीने गुरुवारी रिक्षा बंद आंदोलन पुकारले.. पैठण गेटवरून पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यात रिक्षाचालक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पर्यटननगरीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कडाक्याच्या उन्हात लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत शेकडो जणांना पायपीट करावी लागली. या आंदोलनाचा सिटी बसला फायदा झाला. एरवी रिकाम्या धावणाऱ्या बसमध्ये आज पाऊल ठेवण्यास जागा नव्हती. एसटी महामंडळाला नेहमीपेक्षा गुरुवारी पावणेदोन लाखांची जास्त कमाई झाली.

गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी आक्रमक मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांना कोंबणाऱ्या रिक्षा अडवून दंड वसुली होत आहे. थांबे निश्चित नसल्याने रिक्षा नेमकी कुठे उभी करावी, याविषयी संभ्रम आहे. उपलब्ध थांब्यांवर दहापेक्षा अधिक रिक्षा थांबवता येत नाही. त्यातच ओला, टॅक्सी फॉर शुअरमुळे हळूहळू रिक्षा व्यवसायावर परिणाम होत आहे.

या सर्व बाबींमुळे रिक्षा संघटनांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. ती शासन दरबारी नोंदवण्यासाठी त्यांनी गुरुवारी आंदोलन पुकारले होते. ते यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली होती. रिक्षाचालकांच्या छोटेखानी बैठकाही झाल्या होत्या. त्याचा परिणाम आज दिसून आला. ७० टक्के रिक्षा रस्त्यावर धावल्याच नाही. परिणामी वर्दळीच्या रस्त्यांवर आज नेहमीसारखी कोंडी झाली नाही.

दोन रिक्षांवर दगडफेक जास्त पैसे घ्या, पण...
संपाचीपूर्वकल्पना असल्याने एसटी महामंडळाने शहर बस आणि फेऱ्या वाढवल्या; पण त्यांची संख्या पुरेशी नव्हती. त्यामुळे लोकांचे हाल झाले. जास्तीचे पैसे घ्या, पण आम्हाला सेवा द्या, अशी विनंती ठिकठिकाणी प्रवासी रिक्षाचालकांना करत होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास सिडको चौकात ज्येष्ठ नागरिक गयाबाई वाणी झरिना शेख यांनी रिक्षाचालकास ५० रुपये देते, असेही म्हणून पाहिले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यांना अर्ध्या तासानंतर बस मिळाली.

रिक्षा बंदला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी काही समाजकंटकांनी सकाळी नऊ वाजेच्या जयभवानीनगरात धावणाऱ्या दोन रिक्षांवर दगडफेक केली. या प्रकाराची पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. मात्र, ही माहिती मिळताच इतर भागांतील रिक्षांची वाहतूक थंडावली.

आयुक्तांचे कौतुक
पोलिसआयुक्तांच्या धडाडीचे बराळ, सलामी, अनिल मोगले यांनी कौतुक केले आणि वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. रिक्षाचे परमिट वेळेवर घ्या, ड्रेस कोड पाळा, प्रवासी नियमाप्रमाणेच बसवा. कुणालाही हप्ता देऊ नका, असे आवाहन केले. नियम पाळल्यावरही त्रास होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

उत्पन्न वाढले
एसटीमहामंडळाचे विभाग नियंत्रक रा. ना. पाटील म्हणाले की, संपाची तीव्रता लक्षात घेऊन शहर बसची संख्या ४२ वरून ६८ करण्यात आली. फेऱ्याही वाढवण्यात आल्या. त्याचा फायदा झाला. एरवी शहर बसचे रोजचे उत्पन्न एक लाख ८० हजार होते. ते आज सुमारे तीन लाख ६० हजार रुपये झाले. प्रवाशांचा असाच प्रतिसाद असेल तर पुढील काळात बस, फेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निश्चित प्रयत्न करू.
- रा.ना. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद विभाग.

या मागण्यांसाठी बंद
{पोलिस,आरटीओकडून रिक्षाचालकांना सन्मानाची वागणूक मिळावी.
{अवाजवी दंड वसुली बंद करा.
{रिक्षा थांबे निश्चित करा.
{रिक्षा भाडे हिल्या किलोमीटरला १८, तर दुसऱ्या किलोमीटरला १३ रुपये करा.
{ओला, टॅक्सी फॉर शुअर बंद करा.
{कागदपत्रांची तपासणी होताच रिक्षा सोडून द्या.
{बंद केलेले १३०० परमिट दंड आकारून पुनरुज्जीवित करावेत.
{प्रदीर्घ काळ रिक्षा चालवणाऱ्यांना दरमहा हजार रुपये पेन्शन द्या.
{सीएनजी, एलपीजी पंप सुरू करावा.

अपघात टळला
जालनारोडवर आकाशवाणी चौकातून बसमध्ये चढताना एका महिलेचा तोल सुटला. ती कडेवरच्या मुलासह रस्त्यावर कोसळली. सुदैवाने बसचालकाचे त्याकडे लक्ष होते. म्हणून मोठा अपघात टळला.