आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, वैजापूरमधील युवकाची विदेश भरारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर/ औरंगाबाद - घरचीपरिस्थिती अत्यंत हलाखीची, तरीही शिकण्याची जिद्द आणि जग जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगत शिऊर येथील युवकाने विदेशात भरारी घेतली आहे. उच्चशिक्षण घेऊनही बेरोजगार असणाऱ्या ग्रामीण तरुणांसमोर विजय अण्णासाहेब पगारे या युवकाने आदर्श निर्माण केला आहे .तो अाता झांबिया देशात एका कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहे.

शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा देणाऱ्या थोर घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन त्यांनी दिलेल्या शिक्षणातील सवलतीचा पुरेपूर लाभ घेतला आहे. शेणामातीच्या घरात राहून आई-वडिलांना मोलमजुरीत मदत करत विजयने शिऊरसारख्या ग्रामीण भागातून विदेशात भरारी घेत अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. विजयने दहावीपर्यंतचे शिक्षण हे गरिबांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत घेतले. त्यापुढील १२ वीपर्यंतचे शिक्षण शिऊरच्या संत बहिणाबाई कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. पुढे वाहनात कापूस भरण्याची मजुरी करत येथीलच जीवन विकास महाविद्यालयात बी. एस्सी.चेही शिक्षण पूर्ण केले. बिकट परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेणे अवघड झाल्याने विजयने गावातच मेडिकल स्टोअर्सवर काही काळ काम केले. त्यादरम्यान २०१० मध्ये शिऊरचे भूमिपुत्र जे.के.जाधव यांच्या राजर्षी शाहू टेक्निकल इन्स्टिट्यूट, औरंगाबाद येथे सवलतीच्या दरात एमबीएत प्रवेश घेण्यासाठी पत्रके वाटली. ती पत्रके वाचून विजयने प्रवेश घेण्यासाठी नावनोंदणी केली. त्यानंतर आपल्या उज्ज्वल भविष्याची दिशाच ठरवून टाकली. औरंगाबाद येथे मावशीकडे राहून त्याने पार्टटाइम जॉब करत तीन वर्षाचे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. तो पहिल्या श्रेणीतदेखील उत्तीर्ण झाला होता. विजयला थोरला भाऊ संजय, दीपक आणि भावजयी शालिनी यांचे प्रबळ पाठबळ मिळाले.

भावांच्या पाठबळामुळे यश मिळाले
उच्चपदावर जाण्यासाठी इंग्रजी माध्यम आणि गलेगठ्ठ डोनेशन घेणाऱ्या शाळेतच शिक्षण घेणे गरजेचे नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण हेसुद्धा उपयुक्त ठरते.आयुष्यात प्रत्येकाला संधी मिळत असते फक्त तिला ओळखता आले पाहिजे. जिद्द असेल तर गरीब युवकही यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो.आईवडील आणि भावांच्या पाठिंब्यावर मी हे यश मिळू शकलो.
विजय पगारे, शिऊर,

एक खडतर प्रवास
विजयने एमबीएचे औरंगाबाद येथे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे गाठले. तो दीपक या भावाकडे काही दिवस राहून एका नामांकित मॉलमध्ये जॉब करत होता. या वेळी तो स्वस्थ बसता त्याने इतरत्र नोकरीसाठी प्रयत्न केला. यादरम्यान मुलाखतीसाठी गेल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलंय, असे सांगितल्यावर त्यास अनेक ठिकाणी नकारसुद्धा मिळाला. परंतु जिद्द उराशी बाळगत प्रयत्न सुरूच ठेवले. यादरम्यान त्याने विविध क्षेत्रात कार्यरत तरुणांची ओळख करत मैत्री वाढवली. अशातच अाफ्रिका खंडातील झांबिया देशात मालावी शहरामध्ये एका कंपनीमध्ये मॅनेजर पदावर चांगल्या वेतनावर नोकरी मिळाली.

विजयचा मला अभिमान वाटतो
माझा मुलगा काहीतरी करेल हा विश्वास नक्कीच होता. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन विदेश यशाचा झेंडा रोवेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. विजयचा अभिमान वाटतो. कांताबाईपगारे, आई