आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या साडीवरुन वाद; भावी वधूने घेतले पेटवून, \'व्हॅलेंटाईन डे\'ला होते लग्न!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लग्न आठ दिवसांवर असतानाच नियोजत वधूने सासरच्या नातेवाइकांच्या घरात अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हडकोतील एन-12 मधील नवजीवन कॉलनीत घडली. 90 टक्के जळालेल्या माधुरी प्रकाश झोनवाल हीस एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माधुरीचे 14 फेब्रुवारीला लग्न ठरले होते. त्यामुळे ती भावी पती सचिन हनवतेसोबत साडी खरेदीसाठी गेली होती. साडी खरेदीवरून दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून हा प्रकार घडला असल्याचा निर्वाळा सचिनच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिला.

पदमपुर्‍यातील प्रकाश झोनवाल यांची कन्या माधुरी (22) हिचे लग्न पिसादेवी येथील सचिन हनवतेसोबत जुळले होते. 14 फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता. सचिन बंगळुरू येथे लष्कराच्या पोलिस विभागात कार्यरत आहे. विवाहामुळे तो मंगळवारी शहरात आला आणि हडकोत बहिणीकडे थांबला. बुधवारी माधुरीसोबत लग्नाचे कपडे खरेदीसाठी गेला. साडी निवडण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघे सचिनच्या बहिणीकडे गेले आणि तेथे माधुरीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात सचिनही भाजला. माधुरीला प्रथम एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बेंबडे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या प्रकारानंतर माधुरीच्या नातेवाइकांनी सचिन आणि त्याच्या नातेवाइकांना मारहाण केली. सचिनने सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. माधुरीने सचिनला केलेल्या एसएमएसमध्ये आत्महत्या करण्याचा उल्लेख केला होता. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.