आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद- पेट्रोल पंप तपासणीसाठी ठाणे गुन्हे शाखेचा मुक्काम वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुंडलिकनगरातील एस्सार कंपनीच्या पंपाचे दाेन नोझल सील केले. - Divya Marathi
पुंडलिकनगरातील एस्सार कंपनीच्या पंपाचे दाेन नोझल सील केले.
औरंगाबाद-  तीन दिवसांपासून पेट्रोल पंपावरील इंधन चोरीचा छडा लावण्यासाठी दाखल झालेल्या ठाणे गुन्हे शाखेचा मुक्काम वाढला आहे. पथकाने रविवारी पुंडलिकनगर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाची तपासणी करत तीन नोझल सील केले. या वेळी ५५ एमएल पेट्रोल, डिझेल कमी येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या पथकाचा मुक्काम वाढल्याने शहरातील अनेक पेट्रोल पंप रडारवर असल्याचे समोर येत आहे. 
 
देशभरात पेट्रोल पंपांचा घोटाळा समोर आल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यभर तपासणी सुरू केली आहे. यात पकडण्यात आलेले मुख्य आरोपी डोंबिवलीचा विवेक शेट्ये, पुण्याचा अविनाश यांनी चौकशीत सांगितलेल्या शहर पथकाच्या रडारवर आहेत.
 
शुक्रवारी चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंप पाच लिटरमागे १५० एमएल कमी देत असल्याप्रकरणी पूर्णच सील करण्यात आले. शनिवारी एपीआय कॉर्नर येथील जयभवानी पेट्रोल पंपाचे एक नोझल सील केले. रविवारी सकाळी ११ वाजता पथकाने पुंडलिकनगर रस्त्यावरील एस्सार पेट्रोल पंपाची तपासणी केली. या वेळी चार टप्प्यांमध्ये झालेल्या तपासणीत पाच लिटरमागे ४५ ते ५५ एमएल इंधन कमी येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तीन नोझल सील करत कंट्रोल पॅनल आणि पल्सर किट जप्त केली. 
 
औरंगाबादच्या आरोपीसाठी दुसरे पथक : देशभरात गाजलेल्या या पेट्रोल घोटाळ्यातील तीन आरोपींपैकी एक आरोपी औरंगाबादचा असल्याचे ‘दिव्य मराठी’ने समोर आणले. त्या आरोपीच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी त्याला वाँटेड घोषित केले असून ठाणे गुन्हे शाखेचे दुसरे स्वतंत्र पथक त्याच्या मार्गावर आहे. त्याला अटक केल्यानंतर प्रत्येक शहरातील नेमके पेट्रोल पंप पंपचालक थेट समोर येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
नेमकी चोरी पकडण्यासाठी पथकाचे कसोशीचे प्रयत्न 
पथकाने तीन पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर इंधन चोरी होत असल्याचा घोटाळा समोर आणला, परंतु तरीही आरोपींच्या चौकशीत समोर आलेले प्रमुख मुद्दे अद्याप पथकाला हाती लागलेले नसल्याने पथक असमाधानी असल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी पथकाने ठाणे येथील वरिष्ठांशी चर्चा केली आणि आपला मुक्काम वाढवला. आणखी दोन दिवस पथक राहण्याची शक्यता असून शहरासह ग्रामीण भागातील काही पंपांची पथक तपासणी करणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...