आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: एक कोटीचा महसूल देणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठात सुविधा नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशी विद्यार्थ्यांसाठी अडीच बाय सहा फुटांचे पलंग आहेत. विदेशी विद्यार्थ्यांना यापेक्षा मोठे पलंग हवेत. - Divya Marathi
देशी विद्यार्थ्यांसाठी अडीच बाय सहा फुटांचे पलंग आहेत. विदेशी विद्यार्थ्यांना यापेक्षा मोठे पलंग हवेत.
औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये १९१ विदेशी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडून वर्षाकाठी साधारणत: एक कोटीचे शुल्क आकारण्यात येते. पण त्यांच्या पायाभूत सुविधांकडे विद्यापीठ प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. सुसज्ज वसतिगृह, सोयीच्या वॉशरुम्स, विरंगुळ्यासाठी स्वतंत्र कक्ष, विदेशी विद्यार्थी विभागाला स्वत:ची इमारत अशा कोणत्याही सुविधा नसल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे. 
 
ज्याप्रमाणे भारतीय विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ शैक्षणिक शुल्क घेऊन त्यांना सुसज्ज वर्गखोल्या, वसतिगृहे, प्रयोगशाळा, ग्रंथालय उपलब्ध करून देते, अगदी त्याचप्रमाणे विदेशी विद्यार्थ्यांनाही सुविधा का दिल्या जात नाहीत, असा प्रश्न विदेशी विद्यार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’जवळ उपस्थित केला.
 
भारतीयांच्या तुलनेत विदेशी विद्यार्थी येथील विद्यापीठांना सुमारे पाचपट शुल्क देतात. मग विद्यापीठांनी निवास, भोजनासह सर्व सुविधा देणे गरजेचे आहे. विद्यापीठाने १९६ व्या क्रमांकाच्या ऑर्डिनन्समध्ये पाचपट शुल्क घेण्याचे निर्धारित केले; पण सुविधा देण्याचा उल्लेख कुठल्याही ऑर्डिनन्समध्ये नाही. दिव्य मराठी’ने कॅम्पसमधील विदेशी विद्यार्थी संख्या, त्यांचे शुल्क अन् त्याबदल्यात त्यांना हव्या असलेल्या सुविधांचा आढावा घेतला असता विसंगत स्थिती निदर्शनास आली. 
 
६९ पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून कोटी पाच २५ हजारांचे शुल्क आकारण्यात येते. शिक्षण, शारीरिक शिक्षण, विधी, वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रातील ४१ विदेशी विद्यार्थ्यांकडून ५९ लाख ४५ हजारांचे शुल्क आकारले जात आहे. सर्व विषयांतील विद्यार्थ्यांनी चार वर्षांत पीएचडी पूर्ण केली तर त्यांच्याकडून कोटी ३० लाख रुपयांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठातर्फे घेतले जाते. त्यामध्ये पीजी करणाऱ्यांच्या शुल्काचा समावेश नाही. 
 
सर्वाधिक शुल्क विज्ञानसाठी : कॅम्पसमध्ये ५६ विदेशी विद्यार्थी नॅनो टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आदी विषयांतील एमएस्सी, मानसशास्त्र, लोकप्रशासनशास्त्र, भूगोलमधील एम.ए. आदींसह पाली अँड बुद्धिझम विषयात पीजीचे शिक्षण घेत आहेत. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विज्ञानाला पसंती दिली असून त्याचे शुल्कही अधिक आहे. विज्ञान शाखेतील शुल्क ७०, २३१ ते १, ५३, ४३१ रुपये आहे. 
 
त्याशिवाय उर्वरित विषयांत २० विद्यार्थ्यांकडून वार्षिक ५, २३१ ते २५, २३१ रुपये शुल्क आकारले जाते. विज्ञानचे ३६ तर कला सामाजिक शास्त्रातील २० विद्यार्थ्यांकडून साधारणत: दरवर्षी ४६ लाखांचे शुल्क आकारले जात आहे. 
 
विदेशी विद्यार्थ्यांना स्वतंत्र कक्ष नाही 
शुल्क आकारण्यासाठी विविध प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी एकाच ठिकाणी स्वतंत्र कक्ष हवा आहे. त्याशिवाय इंटरनॅशनल हॉस्टेल्स, स्मोकिंग झोन, रिक्रिएशन सेंटर हवे आहे. इंटरनेट सुविधा हवी आहे. प्रत्येक शैक्षणिक विभागात पाश्चात्त्य शैलीच्या वॉशरुम्सची आणि वातानुकूलित सेंटरचीही गरज आहे. 
 
प्रमाणपत्र मोठे असावे 
हायजेनिक फूड्स प्लाझाची गरज आहे. विदेशी विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र वितरणाची स्वतंत्र व्यवस्था हवी. प्रमाणपत्रांचा आकार भारतीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत मोठा हवा आहे. कारण मायदेशी जाताना प्रमाणपत्राच्या मागील बाजूला दूतावासाचे शिक्के मारले जातात. त्या वेळी जागा कमी पडते. -मन्सूर अली, महासचिव, येमेनी विद्यार्थी संघटना 
 
हॉस्टेलची निर्मिती सुरू 
- सध्या ३५ खोल्यांच्या वन रूम किचनची सुविधा असलेल्या वसतिगृहाची निर्मिती सुरू आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये त्याचे काम पूर्ण होईल. त्यात ७० विद्यार्थी राहू शकतात. - डॉ. मुस्तजीब खान, संचालक, विदेशी विद्यार्थी विभाग.