आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या महिला पर्यटकांनी पोलिसांना धारेवर धरल्याने वेरूळात तणाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या महिला पर्यटकांच्या वाहनचालकास खुलताबाद पोलिसांनी रविवारी मारहाण केल्यामुळे मोठा वाद झाला. 20 हून अधिक असलेल्या महिलांनी खुलताबादच्या पोलिस निरीक्षकांनी दीड तास धारेवर धरल्याने तणाव पसरला होता. अखेर पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे सांगत चालकाकडून दंड वसूल केला.


औरंगाबादहून 20 महिलांना घेऊन टेम्पो टॅÑव्हलर (एमएच एवाय 4512) वेरूळ येथे आला होता. टेम्पो घृष्णेश्वर मंदिरकडून लेणीकडे जात असताना प्रवेशद्वारावर काही गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. याच वेळी टेम्पोचालक पुढे घुसण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार पाहून साध्या वेशातील पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी टेम्पोचालकास पावती घेण्यास सांगितले. परंतु टेम्पोचालक ऐकत नसल्याचे पाहून इतर पोलिस कर्मचा-यांनी ओढताण करून चालकास खाली उतरवले. या वेळी टेम्पोतील महिला व साध्या गणवेशात असलेल्या पोलिस निरीक्षकांत वाद झाला. हा वाद बराच वेळ सुरू होता. काही वेळाने लेणी पोलिस स्टेशन येथून आणखी पोलिस कर्मचारी आल्याने गोंधळात वाढ झाली. त्यानंतर पोलिसांनी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार वाहनचालकाने केली.


लेणीकडे येताना बाजूच्या गाड्यांना पास करून पुढे चाललो होतो. याच वेळी साध्या गणवेशातील दोन पोलिसांनी मारहाण केली. यामुळे मानेवर व्रण उमटले.
गणेश दिवटे, टेम्पोचालक


सध्या या ठिकाणी मोठा बंदोबस्त असून प्रत्येक गाडीची तपासणी सुरू आहे. टेम्पो मध्ये घुसत होता. सूचना पाळत नाही म्हणून गाडी बाजूस घेण्यास लावली. चालक खाली उतरत नसल्याने दार उघडून खाली घेतल्याने त्यास नख लागले. अनिल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक