आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनाचा अभाव - अकॅडमिक कॅलेंडर कोलमडणार; विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला झाला विलंब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 45 विभागांतील 105 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 4,692 जागांसाठी घरबसल्या ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीला 16 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे यंदाही विद्यापीठाचे अकॅडमिक कॅलेंडर कोलमडणार आहे.
विद्यापीठाने गत वर्षीपासून एमकेसीएलच्या (महाराष्ट्र नॉलेज कार्पारेशन लिमिटेड) माध्यमातून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवण्याचे धोरण स्वीकारले. 2011-12 मध्ये 20 हजार विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या आॅनलाइन नोंदणीत सहभाग घेतला, परंतु मागील वर्षी बहुतांश विषयांचे निकाल लांबले. परिणामी प्रवेशप्रक्रियाही लांबली. पर्यायाने विद्यापीठाचे अकॅडमिक कॅलेंडर पूर्णपणे कोलमडले होते. यंदा वार्षिक नियोजन जाहीर करण्यापूर्वी विद्यापीठाने बरीच खबरदारी घेतली, पण शैक्षणिक सत्र 2012-13 मध्येही अकॅडमिक कॅलेंडर कोलमडण्याची शक्यता आहे. कारण नव्या सत्राच्या कॅलेंडरनुसार 22 जून ते 6 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणीची मुदत दिली होती. यंदाही अनेक विषयांचे निकाल लागले नसल्यामुळे प्रवेशप्रक्रियेला 10 दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 16 जुलैपर्यंत नोंदणीच चालणार असल्यामुळे प्रत्यक्षात प्रवेशप्रक्रियेलाही महिना लागण्याची शक्यता आहे. घोषित कॅलेंडरप्रमाणे नोंदणी आणि प्रवेशप्रक्रियेनंतर 9 जुलैला पहिली, 16 जुलैला दुसरी फेरी, तर 21 जुलैला स्पॉट अ‍ॅडमिशनची तारीख ठरली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रवेशप्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील 45 पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयातील 127 अभ्यासक्रमांसाठी अजूनही नोंदणीच केली जात आहे.
फारसा फरक पडणार नाही - विद्यापीठातील काही विषयांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नसल्यामुळे प्रवेशप्रक्रिया लांबवावी लागली. आता 16 जुलैपर्यंत नोंदणी झाली की, दहा दिवसांत दोन टप्प्यांमध्ये प्रवेश यादी घोषित करू. त्यानंतर लगेचच शिकवणी वर्ग सुरू करण्यात येणार आहे. किंबहुना प्रवेश आणि शिकवणी दोन्ही एकाच वेळेला सुरू ठेवण्याचा विचार आहे डॉ. भागवत कटारे, संचालक, बीसीयूडी