आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी कुलसचिव हटाव, विद्यापीठ बचाव’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करत असल्याच्या आरोपावरून सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रशासनाचा कारभार आणि कुलसचिव डॉ.डी.आर.माने यांच्या विरोधात आंदोलन केले. या वेळी ‘राष्ट्रवादी कुलसचिव हाय हाय’, ‘कुलसचिव हटाव, विद्यापीठ बचाव’, ‘माने तुमची दादागिरी थांबवा’, ‘अजितदादांसारखी टगेगिरी खपवून घेणार नाही’ अशा घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता.

या वेळी विद्यार्थी संघटनांच्या वतीने कुलगुरू डॉ.विजय पांढरीपांडे यांना दिलेल्या निवेदनात तक्रारी आणि आरोपांचा पाढाच वाचला. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीशिवाय एकही कार्यक्रम होत नाही. विद्यापीठ सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आहे की, राष्ट्रवादीचे असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाचा हेतू सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे असा होता, पण अधिकारी विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव करतात. विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणार्‍या विद्यार्थी संघटनांमध्ये प्रशासन वाद निर्माण करत आहे. असे करून कुलगुरू आणि कुलसचिवांनी विद्यापीठ चळवळीला बदनाम केल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाकडे समस्या मांडली असता अधिकारीही विद्यार्थी प्रतिनिधी किंवा संघटनेच्या कार्यकत्यांनाच शिवीगाळ करून खच्चीकरण करतात. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले असून त्यांच्यामध्ये नैराश्य आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शुल्काच्या कारणावरून विद्यापीठ बंद ठेवले. ऐन परीक्षेच्या तोंडावर त्या बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक नुकसान झाले. यावरूनच प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रा. प्रकाश इंगळे, कुणाल खरात, सुनील बढेकर, राकेश कांबळे, सचिन निकम, प्रा. धनंजय रायबोले, नागराज गायकवाड, एस.एफ.आय चे राम बुरकुल, सुनील राठोड, विजय सुबगडे, मनविसेचे विशाल आमराव, मनोज भारस्कर आदींची नावे आणि स्वाक्षर्‍या आहेत.

आंदोलनात सहभागी संघटना : सम्यक विद्यार्थी आंदोलन, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, भीमशक्ती विद्यार्थी संघटना, भाजप विद्यार्थी संघटना, युवा सेना, पँथर विद्यार्थी आघाडी, पॅँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन, संविधान बचाव समिती, एसएफआय, बहुजन नवक्रांती सेना आणि निळं वादळ मित्रमंडळ.