आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विद्यादीप बालगृहातील फरिदा (बदललेले नाव) हिला पळवून नेऊन बलात्कार केल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिली असल्याचे छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानोबा मुंडे यांनी दिली. या सामूहिक बलात्कार प्रकरणात पाचवा आरोपी नसल्याचेही निष्पन्न झाले, असेही मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, पाचवा संशयित म्हणून चर्चेत असलेल्या अनिल पाटणी याची चौकशी करून पोलिसांनी त्याला सोडून दिले.
4 जुलै रोजी फरिदा हिचे अपहरण करून निवृत पोलिस उपअधीक्षक र्शीनिवास शर्मा यांच्या घरातील एका खोलीत डांबून तिच्यावर शर्माचा मुलगा किशोर जाधव, किरण चाबुकस्वार, नंदू शिरसाट आणि आनंद नागलोद या चौघांनी आळीपाळीने बलात्कार केला. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. दीड दिवस अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला बालगृहासमोर आणून सोडले होते. बालगृहाच्या अधीक्षिका सिरिया परेरा यांनी चौकशी केली असता फरिदाने आपबिती सांगितली.
याबाबत छावणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सायंकाळी फरिदाला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत नेण्यात आले होते. पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केली. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस निरीक्षक मुंडे यांनी सांगितले की, पोलिस कोठडीतील आरोपींची चौकशी केली असता त्यांनी बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पाचवा आरोपी असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, पाचवा कोणीही नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. पाचवा संशयित म्हणून शनिवारी अनिल पाटणी नामक व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. मात्र, त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सोडून देण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले.
फरिदाला पळवून नेण्यासाठी आरोपींना मदत करणारी तिची मैत्रीण सारिका (नाव बदलले) हिला शनिवारीच अंबाजोगाई येथील बालसुधारगृहात
पाठवण्यात आले आहे. फरिदाला ज्या वाहनातून पळवून नेले त्या वाहनाची माहितीही पोलिस घेत आहेत.