आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्काम कर्मयोग्यांचा संकल्प, ग्रामीण भागातील मुलांना संगणकाचे मोफत धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या शिक्षणाची जाणीव ठेवून एका तरुणाने ग्रामीण भागातील मुलांना मोफत शिकवायला सुरुवात केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून तो नोकरी सांभाळून त्यांना नव्या युगाचा मंत्र असलेल्या संगणकाचे धडे देत, नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज करत आहे. दुसरीकडे सत्तरीच्या उंबरठय़ावर असणार्‍या एका काकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनोखी पद्धत विकसित केली आहे.

वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी येथील रहिवासी प्रा. बाबासाहेब सोनवणे यांनी स्वत: प्रतिकूल परिस्थितीत अनंत अडचणींचा सामना करत आपले ध्येय पूर्ण केले. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. पुढे पाचवीपासून 5 किमी अंतरावर बोरसर गावात शिक्षण घेतले. पदोपदी संघर्ष करत मामाच्या मदतीने सोनवणे यांनी सरस्वतीची आराधना केली. अहोरात्र मेहनत करून दहावीला प्रथम र्शेणी मिळवली. पुढे पॉलिटेक्निक केले आणि स्वत:चे करिअर घडवले. पॉलिटेक्निकनंतर बीई करण्यासाठी सोनवणे यांनी हॉटेलात काम केले. पहाटे 4 ते 7 अभ्यास, त्यानंतर कॉलेज अन् त्यानंतर हॉटेलात नोकरी. यातून मिळणार्‍या पैशातून ही पदवी मिळवली.

समाजाचे देणे
स्वत: पाहिलेली गरीबी आणि कष्ट लक्षात घेऊन प्रा. सोनवणे यांनी केवळ स्वत:पुरते न जगता समाजाचे देणे फेड़ण्याचा संकल्प केला. त्यातूनच ते 2009 पासून गंगापूर तालुक्यातील फतियाबाद या गावात एका खोलीत 7 वी 10 वीपर्यंतच्या मुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत 100 पेक्षाही जास्ता मुले त्यांनी घडवली आहेत. आपली एमआयटीतील प्राध्यापकाची नोकरी सांभाळून ते या मुलांना साध्या साध्या गोष्टींपासून ते इंटरनेटपर्यंत सर्व बाबी शिकवत त्यांना जगाची सफर घडवत आहे. संगणकाच्या माध्यमातून क्षितिजापर्यंत पाहू शकणारी नजर देत आहे. रविवारी सुटी असल्याने ते दर रविवारी या गावात जातात व सकाळी ही शिकवणी घेतात.

यातून खूप समाधान मिळते
मी स्वत: ग्रामीण भागातून आलो आहे. त्यामुळे येथील मुलांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. या मुलांना शिकवल्यावर मिळणारे समाधान खूप मोठे आहे. त्यांना खास करून संगणकाचे ज्ञान देण्याची गरज आहे. त्यासाठी मी मनापासून प्रयत्न करतो. या कामात मला डॉ. वाय. ए. कवडे, प्रा. डॉ. संतोष भोसले आणि प्रा. मुनिश शर्मा यांचे मनापासून मार्गदर्शन मिळते.
प्रा. बाबासाहेब सोनवणे

..तर यांना संपर्क करा
अनेक लोक समाजासाठी काही तरी करू इच्छितात. सगळा समाज शिक्षित व्हावा आणि त्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा, असे अनेकांना वाटते, पण त्यांना योग्य दिशा व व्यासपीठ मिळतेच असे नाही. अशांनी प्रा. सोनवणे (9673566161) व गिरीश काळेकर (9028045199) यांच्याशी संपर्क साधावा.