आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधील मोदींच्या जाहीर सभेनंतर मतदारांत संभ्रम वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवडणुकीनंतर राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येईल, याबाबत औरंगाबादकरांमधला संभ्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर वाढल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणानंतर समोर आली आहे. मोदींना सर्वच पक्षांनी लक्ष्य केल्यामुळे असेल; पण भाजपचे सरकार येईल, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाणही कमी होत असल्याचे आढळून आले आहे.
औरंगाबाद शहरात मोदींची सभा होणार हे जाहीर झाल्यानंतर ‘दिव्य मराठी’ ने दोन दिवसांपूर्वी एक सॅम्पल सर्व्हे केला. त्यात नोकरदार, महिला, तरुण, छोटे व्यावसायिक, डॉक्टर्स, वकील आणि रिक्षाचालक यांना ‘निवडणुकीनंतर राज्यात कोणाचे सरकार येईल असे वाटते?’ हा एकच प्रश्न विचारण्यात आला. ज्या दिवशी हा सर्व्हे करण्यात आला त्या दिवसापर्यंत मोदींची एकही सभा राज्यात झालेली नव्हती.
भाजपचे सरकार येईल
शिवाय, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने थेट मोदी यांना लक्ष्य केलेले नव्हते. त्या सर्व्हेक्षणात भाजपचे सरकार येईल, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ३९ टक्के होते तर सांगता येत नाही असे उत्तर १३ टक्के लोकांनी दिले होते. शिवसेनेचे सरकार येईल, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण १२ टक्के होते. शनिवारी औरंगाबादमध्ये मोदी यांची सभा झाल्यानंतर रविवारी पुन्हा तोच प्रश्न त्याच क्षेत्रातल्या तितक्याच लोकांना विचारला. त्यावेळी मात्र आकडेवारीत बराच बदल झालेला आढळून आला. सांगता येत नाही असे उत्तर देणाऱ्यांचे प्रमाण वाढून ते १८ टक्क्यांपेक्षा जास्त झाले. आश्चर्य म्हणजे भाजपचे सरकार येईल असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ३३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. शिवसेनेचे सरकार येईल, असे उत्तर देणाऱ्यांचे प्रमाण देखील १० टक्क्यांवर आले आहे. शिवसेनेसह मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेसने मोदींवरच सुरू केलेल्या टीकेमुळे हे मतपरिवर्तन झाले असावे.