आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजमध्ये लघुउद्योजकांसाठी हक्काचे गाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाळूज व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत गाळे मिळावेत म्हणून चार वर्षांपासून सुरू असलेल्या लघुउद्योजकांच्या लढ्याचे अखेर सार्थक झाले. हायकोर्टाच्या आदेशानुसार गाळे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रचनाही तयार करण्यात आली असून पंधरा दिवसांत निविदा काढल्या जातील, अशी माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
या एमआयडीसीतील अनेक लघुउद्योजकांनी भाडेतत्त्वावर गाळे घेऊन उद्योग थाटले होते. मात्र अपुर्‍या जागेमुळे त्यांना उद्योग विस्ताराची संधीच नव्हती. एमआयडीसीकडे गाळ्यांची मागणी करूनही जागा उपलब्ध होत नव्हती. त्यासाठी ‘मसिआ’कडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. शिवाय भाडेही परवडत नसल्याने उद्योजकांची कुचंबणा होत होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी 300 लघुउद्योजकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून एमआयडीसी प्रशासनाने गाळे बांधून देण्याबाबत मागणी केली होती.
500 चौरस फूट जागा
उच्च् न्यायालयाने आदेश देऊन दोन वर्षे लोटल्यानंतरही एमआयडीसीकडून गाळे उभारणीविषयी हालचाल होत नव्हती. मात्र, लघुउद्योजकांनी रेटा लावल्यामुळे आता प्रक्रियेने वेग घेतला आहे. वाळूज एमआयडीसीमध्ये हे गाळे दिले जाणार असून 237 गाळ्यांची रचनाही तयार करण्यात आली आहे. ‘ना नफा ना नोटा’ तत्त्वावर हे बांधकाम होईल. यात प्रत्येक उद्योजकाला 500 चौरस फूट जागा देण्यात येणार असून गाळेधारकांना सर्व सुविधा दिल्या जातील.
तातडीने काम सुरू व्हावे
कोर्टाच्या आदेशानंतरही कामाला गती नव्हती. आता निविदा निघणार म्हटल्यावर एमआयडीसीचे अभिनंदन केले पाहिजे. यामुळे वाळूजमध्ये उद्योगवाढीला चालना मिळेल. पुन्हा आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे हे काम तातडीने व्हावे, हीच अपेक्षा आहे. यामुळे वाळूजमध्ये उद्योगवाढीला चालना मिळेल, असे मत ‘मसिआ’चे अध्यक्ष सुनील भोसले यांनी व्यक्त केले.