आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण : ‘पाणी बायपास बंदी’चा निर्णय सभापतींना अमान्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बायपास बंद करण्याचा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतलेला निर्णय पचनी पडला नसल्याचे स्थायी समितीचे सभापती आणि बायपासद्वारे पाणीपुरवठा होणार्‍या वेदांतनगर प्रभागाचे नगरसेवक विकास जैन यांनी सांगितले. सर्व पदाधिकार्‍यांशी चर्चा करून घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. एकतर्फी निर्णय आम्ही कसा मान्य करणार, असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सर्मथनगरचे नगरसेवक समीर राजूरकर यांनीही आयुक्तांच्या निर्णयाविरोधात सूर आळवला आहे. बायपास बंद केल्याने पाणीपुरवठय़ात सुधारणा होण्याची शक्यता कमीच असून त्याऐवजी जुन्या शहराचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी बायपास बंद करण्याच्या निर्णयाला सत्ताधारी नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. जुन्या भागाला बायपासद्वारे पुरवठा होतो आणि या भागातून सत्ताधारी नगरसेवक आजवर निवडून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतचे आयुक्त बायपास बंद करू शकले नाहीत. मात्र, आता डॉ. भापकर यांनी हे धाडस दुसर्‍यांदा दाखवले. गेल्या उन्हाळ्यात काही दिवसांसाठी त्यांनी बायपास बंद केले होते. मात्र, नंतर नगरसेवकांचा दबाव वाढल्यामुळे ते पुन्हा सुरू झाले.
शहरात सिल्कमिल कॉलनी येथे 2, बन्सीलालनगर, एसएससी बोर्ड, कोकणवाडी आणि क्रांती चौक येथे प्रत्येकी 1 असे सहा बायपास बंद करण्याचे आदेश डॉ. भापकर यांनी मंगळवारी दिले होते. त्यामुळे जलकुंभ भरून सर्व ठिकाणी समान पाणी मिळण्यास मदत होईल, असा दावा डॉ. भापकर यांनी केला होता. या निर्णयावर महापौर अनिता घोडेले यांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. सर्व पदाधिकारी एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, जैन यांनी हा निर्णय पचनी पडणार नसल्याचे स्पष्ट करतानाच सर्व पदाधिकार्‍यांशी चर्चा करून घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. एकतर्फी निर्णय आम्ही कसा स्वीकारणार, असा सवाल केला. त्यामुळे या निर्णयाचा आयुक्तांना फेरविचार करावा लागेल .
बायपासशिवाय कुंभ भरू शकत नाहीत - बायपास बंद केल्यास कुंभ लवकर भरतात हा आयुक्तांचा दावा जैन यांनी खोडून काढला. बायपासशिवाय कुंभ भरू शकत नाहीत. मात्र, त्यासाठी योग्य ते नियोजन करावे लागते, असे सांगितले.
बायपासमधून जुन्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. पुरवठा सुरळीत करायचा असेल तर बायपास सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही. समांतरचे पाणी लवकरच येणार आहे. त्यामुळे डॉ. भापकर यांनी प्रयोगशाळा बंद करावी. समीर राजूरकर, नगरसेवक, सर्मथनगर.