आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची चिंता मिटली! पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडीत 5 टक्क्यांवर साठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरीही जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे औरंगाबादकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्राची पाणी कपातीच्या संकटातून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यांच्या धरणांतील पाणी जायकवाडीत दाखल होत आहे. गेल्या 12 तासांत जायकवाडीत साडेतीन टक्के पाणी जमा झाले आहे. सध्या धरणाचा साठा पाच टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा प्रवाह कमी झाला असला तरी येत्या दोन-तीन दिवसांत जायकवाडी धरणाची पाणीपातळी 10 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरणात वरील धरणांतून गुरुवारपर्यंत आलेल्या पाण्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढत चालला असून एका दिवसात 1.44 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर गेला आहे. गुरुवारी 20 हजार 240 क्युसेकची झालेली आवक शुक्रवारी 13 हजार 520 वर आली होती, असे असले तरी पाण्याचा प्रवाह कायम आहे. मराठवाड्याची तहान भागवणारा प्रकल्प म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात धरणाचा पाणीसाठा थेट 1 टक्क्यावर आला होता. त्यात पावसानेदेखील दडी मारल्याने केवळ 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा धरणात शिल्लक राहिला होता; परंतु जायकवाडी धरणाच्या वरील भागात जोरदार पाऊस झाल्याने नागमठाण, भंडारदरा, पालखेडा, नांदूर-मधमेश्वर या धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

दोन दिवसांत जायकवाडी 10 टक्क्यांवर जाण्याची आशा
जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या नांदूर- मधमेश्वर धरणातून सध्या 9648 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणात सध्या 13 हजार 520 क्युसेक पाणी येत आहे.त्यामुळे येत्या दोन- तीन दिवसांत जायकवाडीचा जलसाठा दहा टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) सूत्रांनी व्यक्त केली आहे.

जायकवाडी धरणात 31 जुलै रोजी आलेल्या पाण्यामुळे एकाच दिवसात 5 टक्क्यापर्यंत पाणी पातळीत वाढ होण्याची पहिलीच वेळ आहे. सध्या धरणाचा साठा 5 टक्क्यांवर आल्याने उद्योगाला जी 20 टक्के पाणी कपात करण्यात आली होती, ती बंद होणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.

ग्रामीण भागालाही दिलासा
पावासाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थितीला तोंड देणार्‍या मराठवाड्याला जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या औरंगाबादबरोबरच जालना आणि परभणी जिल्ह्यातील गावांना पिण्याबरोबरच सिंचनासाठीही आवर्तन मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अशी सुरू आहे आवक
जायकवाडीच्या वरच्या नांदूर- मधमेश्वर धरणाशिवाय नागमठाण धरणातून 13 हजार 520 क्युसेक, भंडारदरातून 847, पालखेडमधून 1750 क्युसेक पाण्याच्या विसर्ग गोदावरीच्या पात्रात सोडण्यात
आला आहे.


नांमकातून हक्काचे पाणी प.महाराष्ट्रात
औरंगाबाद - मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नांदूर-मधमेश्वर धरणातून कोपरगाव, राहता, शिर्डीकडे वळवणे सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांत 1400 क्यूसेक पाणी वळविण्यात आले आहे. हा सर्व विसर्ग जायकवाडी धरणात दाखल होणे अपेक्षित असताना पश्चिम महाराष्ट्राने नेहमीप्रमाणे दांडगाई केल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केली आहे. 31 जुलैला नांदूर-मधमेश्वरच्या डाव्या कालव्यातून 250, उजव्यातून 350 तर एक ऑगस्टला डाव्या कालव्यातून 300 आणि उजव्यातून 500 क्युसेक्स पाणी वळवण्यात आले, असे सिंचन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जायकवाडी 50 टक्के भरेपर्यत कालव्यातून पाणी सोडण्यात येवू नये, असा नियम आहे.

वरच्या धरणांची पाणी पातळी
करंजवण 43.50 %
गंगापूर 81.52 %
दारणा 76.38 %
ओझरखेड 19.41 %
पालखेड 94.71 %
मुळा 34.81 %
नांमका 79.27 %
निळवंडे 40.84 %