आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद एटीएसने डीएनएसाठी सॅम्पल, दिल्यानंतर झाली होती जिंदालला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील प्रमुख आरोपी अबू जिंदाल याला पकडून देण्यासाठी तत्कालीन एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले होते. दुबई येथे भारतीय गुप्तचर यंत्रणेने त्याला पकडल्यानंतर मी भारतीय नसून माझे नाव रियासत अली अाहे. मी पाकिस्तानचा नागरिक असल्याचे त्याने ठासून सांगितले होते. तसा पासपोर्टही त्याच्याकडे होता. त्यामुळे दुबई सरकारने त्याला ताब्यात देण्यास नकार दिला होता. तेव्हा तत्कालीन एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बीड येथून त्याच्या वडिलांचे वैद्यकीय नमुने दुबईपर्यंत पोहोचवले आणि तोच अबू जिंदाल ऊर्फ जबिउद्दीन अन्सारी असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले होते.
२००६ मध्ये वेरूळ मार्गावर दौलताबादच्या घाटात एके ४७ चा स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्या वेळी बीडची फय्याज कागजी आणि अबू जिंदाल जोडगोळी पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. बांगलादेश आणि त्यानंतर पाकिस्तानात ते स्थायिक झाले होते. त्याने तेथे लग्न करून स्वत:चे नाव रियासत अली असे केले. २०१२ मध्ये तो दुबई येथे आल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. यंत्रणेने वेगाने हालचाली करत त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली.

एटीएसअधिकाऱ्यांनी घेतले होते वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रूप : रियासतअली हा जबिउद्दीन आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करणे महत्त्वाचे होते. यासाठी त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणाचे तरी वैद्यकीय नमुने आवश्यक होते. म्हणून एटीएस अधिकारी बीड येथे गेले. जबिउद्दीनचे वडील राहत असलेल्या भागात दोन दिवस साथरोग आजाराचे सर्वेक्षण सुरू केले. त्यानंतर त्यांच्या घरात गेले. आम्ही वैद्यकीय अधिकारी असून तुमच्या भागात मलेरियाची साथ सुरू असल्याने तुमचे वैद्यकीय नमुने लागतील, असे त्याच्या वडिलांना सांगितले. मात्र, त्याच्या वडिलांनी ते देण्यास नकार दिला. तब्बल दोन तास त्यांची समजूत घालत अधिकाऱ्यांनी नमुने मिळवले. अवघ्या तीन दिवसांत नमुने औरंगाबादहून दुबईला येथे पोहोचवण्यात आले आणि रियासत अली म्हणजेच अबू जिंदाल असल्याचे स्पष्ट झाले.

औरंगाबादहोते सेंटर : फय्याजआणि जबिउद्दीन २००६च्या अगोदरही औरंगाबादला यायचे. या वेळी ते काश्मीर येथे वास्तव्यास असणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आले. १९९२- ९३ मध्ये झालेल्या दंगलीत कसे अत्याचार झाले असे सांगून त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. प्रथम काही धार्मिक आणि सामाजिक कामात सहभागी होणारे हे दोघेही या धर्मांध संघाटनांकडे आकर्षित झाले होते. अबू गजाआड झाला असला तरी कागजी मात्र अजून पाकिस्तानात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठाकरेंच्या ट्रॅपची माहिती मागवली होती
औरंगाबाद एटीएसमध्ये २०१२ मध्ये कार्यरत पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांना २०१४ मध्ये गुन्हे शाखेत कार्यरत असताना लाच घेताना अकोला एसीबीच्या अधिकाऱ्याने पकडले होते. त्या प्रकरणाची माहिती मुंबई येथे जेलमध्ये शिक्षा भोगत असताना अबू जिंदालने मागितली होती. ज्याच्याकडे ठाकरे यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे तो पैशाचा पाऊस पाडणारा भोंदू बाबा होता.
बातम्या आणखी आहेत...