आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत होणार विमानाच्या स्क्रूचे उत्पादन; एक हजार रोजगार संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येथील प्रसिद्ध बागला ग्रुप ऑफ कंपनीजने नट बोल्ट क्षेत्रात जगातील आघाडीच्या इटलीतील फोन्टाना ग्रुपशी स्क्रू उत्पादन निर्मितीचा करार केला आहे. येथून लवकरच जगभरातील विमानांना लागणारे स्क्रू तयार होणार आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात भविष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या एक हजार जणांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी आहे. बागला समूह हा गेल्या अनेक वर्षांपासून ऑटोमोबाइल उत्पादनांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. उत्तर व दक्षिण भारतात या कंपनीच्या उत्पादनांचा मोठा विस्तार आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिकल व फ्रिज आदी शीत उपकरणांना लागणाऱ्या मशीन तयार करते. देशातील आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्यांचे सुटे भाग बागला समूहात तयार होतात.
औरंगाबादेत पहिली इटालियन कंपनी
बागला ग्रुपसोबत करार करून औरंगाबादेत पहिल्यांदाच इटालियन कंपनी आपले उत्पादन तयार करीत आहे. फोन्टाना ग्रुप हा जगातील सर्व कंपन्यांना स्क्रू- नटबोल्ट तयार करून देतो. या क्षेत्रातील ही जगातील अव्वल क्रमांकाची कंपनी आहे. फोन्टाना समूहाचे उत्पादन १९ देशांत असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून ती देशात प्रथमच बागला समूहासोबत औरंगाबादेतून उत्पादन करणार आहे. फोन्टाना समूह स्क्रू, नट बोल्ट क्षेत्रात दिग्गज मानला जातो. या प्रकारातील जगात सर्वाधिक पेटंट त्यांच्याकडेच आहेत. जगभरातील विमानांना लागणारे स्क्रू ही कंपनी तयार करते. आता बागला समूहाच्या पैठण रोडवरील फारोळा येथील बी.जी. फोर्जिंग प्रकल्पात हे स्क्रू तयार होतील.
हेच खरे मेक इन इंडिया..
आमचा हा करार म्हणजे खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया आहे. करार झाला आहे. मात्र काही गोष्टी बाकी आहेत, यातून मोठा रोजगार उपल्ब्ध होईल.
- ऋषिकुमार बागला, एमडी, बागला ग्रुप
भारत विश्वासू बाजारपेठ
भारत आमच्यासाठी विश्वासू व मोठी बाजारपेठ आहे. बागला ग्रुपच्या माध्यमातून प्रथमच भारतात उत्पादन आणत आहोत.
-गिसेपी फोन्टाना, उपाध्यक्ष, फोन्टाना