आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या होणार बाद... म्हणा, स्मार्ट औरंगाबाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट सिटीसाठी राज्य सरकारकडून मनपाला १०० कोटी रुपये देता एमएमआरडीए सिडकोच्या माध्यमातून हा निधी दिला जाणार आहे. एसपीव्हीची स्थापना होताच पहिल्या वर्षी ५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. मंगळवारी मनपाच्या सभेत स्मार्ट सिटीची माहिती मिळताच नगरसेवकांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला.
या पाच बाबींमुळे होईल स्मार्ट सिटी
- जागतिक स्तरावर पर्यटकांचे आवडते शहर. वेरूळ-अजिंठासारखी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे.
- पाणचक्की, बीबी का मकबरा, ५२ दरवाजे यासारखी ऐतिहासिक स्थळे
- स्पर्धेतील शहरांच्या तुलनेत कनेक्टिव्हिटी. विमान, रेल्वे वाहन सेवा उपलब्ध.
- झपाट्याने विकसित होणारा औद्योगिक परिसर. डीएमआयसीमुळे जगातील उद्योगांचे आकर्षण केंद्र.
वर्षभरात कामे सुरू: बकोरिया
स्मार्ट सिटीचे काम कधी सुरू होणार ?
आजचएसपीव्हीची नोंदणीही झाली. त्यामुळे तिचे कामकाज लगेच सुरू करता येईल. पहिली बैठक झाली की त्यात बऱ्याच बाबींवर निर्णय घेतला जाईल.

कामे कधी सुरू होतील?
येत्यामहिने ते वर्षभरात कामे सुरू झाल्याचे निश्चितच दिसेल.

स्मार्टसिटीमुळे रस्ते चांगले होतील का?
रस्त्यांची थेट कामे स्मार्ट सिटीतून होणार नाहीत; पण आपण नागरी परिवहन हा पॅन सिटी प्रकल्प घेतला आहे. त्यात वाहतूक व्यवस्था स्मार्ट केली जाणार आहे. यासाठी रस्ते चांगले असतील तरच त्याला अर्थ आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावताना रस्त्यांची कामेही मनपा आणि राज्य सरकारच्या निधीतून होतील.

स्मार्टसिटीत पाणीप्रश्न सुटेल का ?
स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा मुख्यत: घनकचरा व्यवस्थापन, नागरी परिवहन यंत्रणा ग्रीनफिल्ड असा असला तरी स्मार्ट सिटीमध्ये मुबलक पाणीपुरवठा ही अट आहेच. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रकल्पातून सोय करता येईल. शहराला किमान २०० एमएलडी पाणी आजघडीला हवे आहे. याचाच अर्थ जायकवाडीतून पाण्याचा उपसा वाढवावा लागणार आहे. त्या अनुषंगाने स्मार्ट सिटीतून निश्चितच काही तरी करता येईल.

संधी आहे, सोने करूया!
औरंगाबादचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाल्याची बातमी येताच सोशल मीडियावर एक पोस्ट भलतीच व्हायरल झाली. त्यात लिहिले होते ‘चला, म्हणजे आता तरी औरंगाबादची खड्ड्यांतून मुक्तता होईल.’ ही पोस्ट कोणी एकाने केली असली तरी ती सार्वत्रिक भावना आहे यात शंकाच नाही. हे शहर काही सुधारणार नाही, असा ठाम विश्वास या शहरातल्या बहुतांश नागरिकांना वाटत आला आहे आणि म्हणून ‘नाही स्मार्ट झाले तरी चालेल; पण हे शहर खड्ड्यांचे शहर राहू नये’ अशी अपेक्षा औरंगाबादकर करीत आहेत. ही पार्श्वभूमी असल्याने औरंगाबादचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाल्याच्या बातमीचे स्वागत करायचे की नाही, असा संभ्रम अनेकांना पडला आहे.
औरंगाबाद शहर स्मार्ट होईल, यावर बहुतांश औरंगाबादकर विश्वासच ठेवायला तयार नाहीत. कारण गेल्या २०-२५ वर्षांतल्या या शहराच्या वाटचालीचा इतिहास त्यांच्या समोर आहे. तरीही या योजनेत या शहराचा समावेश झाला, याचे स्वागतच करायला हवे, असे आम्हाला वाटते. बदल घडण्याची ही सुरुवात असू शकते. ती सुरुवात करण्याची संधी म्हणून या निर्णयाकडे पाहिले आणि या संधीचे सोने करण्याचा निश्चय सर्वांनी केला तरी ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनासाठीची खाण असलेले हे शहर बदलायला वेळ लागणार नाही. सकारात्मक विचार आणि त्यातून होणारी सकारात्मक कृती यातूनच जगभरात सकारात्मक बदल झाले आहेत हाही इतिहास आपल्या समोर आहेच. हे शहर सुधारणार नाही, असा निराशावादी सूर लावणाऱ्यांचा बहुतांश रोख या शहराला आतापर्यंत मिळालेल्या लोकप्रतिनिधींवर असतो. विशेषत: नगरसेवक आणि महापालिकेचे पदाधिकारी यांच्याबाबतीत ते अधिक नकारात्मक असतात. सर्वच लोकप्रतिनिधी वाईट असतात असे नाही; पण व्यवस्थेलाच जेव्हा कीड लागते तेव्हा सर्व व्यवस्थाच बदनाम होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता या योजनेत काही धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत आणि लोकप्रतिनिधींचे वर्चस्व(या योजनेपुरते) कमी करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत खरे तर असे होणे समर्थनीय नाही. पण लोकप्रतिनिधींचे प्राबल्य असलेली व्यवस्था जेव्हा पुरेशी परिणामकारक ठरत नाही तेव्हा अशी पर्यायी व्यवस्था अनुभवून पाहावीशी वाटते. तो अनुभव घेण्यासाठी आज तरी या योजनेचे आपण स्वागत करायला हवे.
या योजनेचे दृश्य परिणाम दिसायला अजून साधारण वर्ष-दीड वर्ष वाट पाहावी लागेल. संपूर्ण योजना पूर्ण व्हायला दशक जाईल. त्या काळात सर्वकाही आलबेल असेल, अशा भ्रमात राहण्याचेही कारण नाही. ज्या सकारात्मकतेने आम्ही या योजनेचे स्वागत करण्याचे आवाहन करीत आहोत त्याच सकारात्मकतेने योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारीही स्वीकारीत आहोत. योजनेतील चांगले आणि सकारात्मक घटक समाजासमोर आणताना वाईटाला, चुकांना उजेडात आणून त्यांना रोखण्यालाही स्वतंत्र आणि निर्भीड माध्यम म्हणून आमचे प्राधान्य असेल, याविषयी औरंगाबादकरांनी खात्री बाळगावी.
- दीपक पटवे
स्मार्ट सिटीचा प्रकल्प हाताळण्यासाठी विशेष उद्देश वाहन अर्थात एसपीव्हीची स्थापना करण्यात आली आहे. आधीच्या एसपीव्हीच्या रचनेत बदल करून महापालिकेच्या प्रतिनिधित्वात वाढ करून ही कंपनी १५ संचालकांची करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटीचे सारे काम एसपीव्ही ही कंपनी पाहणार आहे. ही कामे करताना महापालिकेच्या अधिकारात असणाऱ्या काही बाबी एसपीव्हीकडे जाणार आहेत. या कामांपुरता सारा कारभार एसपीव्ही पाहणार आहे.

{स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात मनपाचे हक्क आणि बांधिलकी एसपीव्हीकडे जाणार.
{मनपाकडे कायद्याने उपलब्ध असलेले निर्णयाचे अधिकार एसपीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला असतील.
{नगरविकास खाते, मनपा यांचे फक्त या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार एसपीव्हीच्या संचालक मंडळाला असतील.
{ याचाच दुसरा अर्थ असा की स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातील ग्रीनफिल्ड इतर बाबी हाताळताना एसपीव्ही मनपाच्या सहकार्याने निर्णय घेऊ शकणार आहे. उर्वरित शहराबाबत मनपाच आपले अधिकार वापरू शकणार आहे.
हे असतील सदस्य
{ महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता
{वरील पदाधिकाऱ्यांशिवाय इतर राजकीय पक्षांचे नगरसेवकांच्या संख्याबळानुसार प्रत्येकी एक असे दोन सदस्य असतील.
{राज्य शासनाचे चार संचालक (मार्गदर्शक म्हणून अपूर्व चंद्रा, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सहकार्यकारी संचालक सिडको)
केंद्र शासनाचा एक संचालक
{ दोन स्वतंत्र संचालक. यांची निवड केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या संचालकांच्या डेटाबँकमधून करण्यात येईल.
{ मुख्य कार्यकारी अधिकारी. ही व्यक्ती शासकीय अधिकारी असेल आणि आयएएस अधिकाऱ्यांचा यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल अथवा रीतसर जाहिरात काढून शासनाने निश्चित केलेल्या अर्हतेनुसार करण्यात येईल.
नक्षत्रवाडी बोनस
महापालिकेच्या प्रस्तावात चिकलठाण्यात ग्रीन फिल्ड उभारण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय आपण नक्षत्रवाडीतही ग्रीनफिल्ड उभारू, असा इरादा आयुक्तांनी जाहीर केला आहे. नक्षत्रवाडीत ग्रीनफिल्डसाठी लागणाऱ्या जागेपैकी ८० टक्के जागा शासकीय असल्याने ती मिळवताना मनपाला फारसे श्रम पडणार नाहीत. शिवाय चिकलठाण्यात काही अडथळे आले तर लगेच दुसरा पर्यायही हाती ठेवण्याचा हा मनपाचा प्रयत्न आहे. चिकलठाण्यातील ग्रीनफिल्डचा मार्ग मोकळा झाला, तर नक्षत्रवाडीचे ग्रीनफिल्ड हा मनपासाठी बोनस ठरणार आहे.
औरंगाबाद. बुधवार, २१ सप्टेंबर २०१६
नक्षत्रवाडी दुसरा टप्पा : ग्रीनफिल्ड
बातम्या आणखी आहेत...