आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या रफिकची हिमालय स्वारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हिमालयातील बर्फाने आच्छादलेले शिखर पादाक्रांत करण्यासाठी जिगर लागते. औरंगाबादचा पोलिस शिपाई रफिक शेख तौहेत गुरुवारपासून देशातील तिस-या क्रमांकाचे उंच कामेट शिखर सर करण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. भारताचा दहासदस्यीय चमू 40 दिवसांत ही मोहीम फत्ते करणार आहे. यात रफिकसह महाराष्ट्रातील तिघे आहेत.


रफिक सध्या खुलताबाद पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई आहे. 2005 मध्ये नोकरीला लागल्यानंतरही त्याला गिर्यारोहणाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने माउंटेनिअरिंगचे बेसिक प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर त्याने हिमाचल प्रदेशात आधुनिक प्रशिक्षण घेतले. तेथे मित्रांसह त्याने कामेट सर करण्याचे ठरवले. 25 एप्रिल ते 5 मेदरम्यान ही मोहीम आखली.

दररोजची मेहनत : रफिकने रोज 30 किलो वजनाची सॅक घेऊन गोगाबाबा टेकडी ते दौलताबाद असे 20 कि.मी. ट्रेकिंग केले. आठवड्यात 4 दिवस जलतरण, सायकलिंग केले. आहारही ठरवून घेतला. प्रशिक्षक डॉ. रंजन गर्गे, विनोद नरवडे यांचे त्यास मार्गदर्शन मिळाले.


अशी निर्माण झाली आवड :
रफिकला लहानपणापासून साहसाची आवड होती. कॉलेज जीवनात एनसीसीच्या माध्यमातून गिर्यारोहणाची संधी मिळाली. कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता 2005 मध्ये आयसीएफच्या माध्यमातून हिमाचल प्रदेशातील फे्रंडशिप, क्षितिधार, सेव्हन सिस्टर आणि पाताळ सू अशी चार शिखरांची मोहीम त्याने फत्ते केली. त्यानंतर 2010 मध्ये वेस्टर्न हिमालयीन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट (डब्ल्यूएचएमआय) येथे बेसिक ट्रेनिंग आणि त्यानंतर 2012 मध्ये हिमालयीन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट (एचएमआय) येथे अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण घेतले. त्याने चांगल्या कंपनीचे दीड लाखाचे साहित्यही खरेदी केले आहे.
असे येऊ शकतात अडथळे :
कामेट शिखर सर करताना अनेक अडणींचा सामना करावा लागणार आहे. या ठिकाणी सतत वातावरण बदलत असते. तात्पुरता विसराळूपणा येणे, रक्ताच्या उलट्या होणे, गँगरिन, सतत बर्फ आणि पाऊस अशी परिस्थिती उद्भवते. काही ठिकाणी जास्त बोलता येत नाही. हळू आवाजामुळेही बर्फ कोसळण्याची शक्यता असल्याने हातवा-यांनीच संवाद साधावा लागतो. जास्त पाऊस पडत असल्यास मोहीम काही काळ थांबवावी लागते.

रफिकला या मोहिमेसाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, उपअधीक्षक संदीप जाधव, सहायक निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी मार्गदर्शन करतानाच आर्थिक मदतीसह भक्कम पाठबळही दिले.
कामेट शिखर
० कामेट (7756 मी.) देशातील तिसरे उंच शिखर.
० पहिल्या क्रमांकावर कांचनजुंगा (8586मी.), तर नंदादेवी (7824 मी.) दुस-या क्रमांकावर आहे.
० या तिन्ही शिखरांमध्ये कामेट चढाईसाठी सर्वात कठीण.
० काही ठिकाणी 90 अंशांपर्यंत चढाई करावी लागते.
० एव्हरेस्ट चढाईसाठी कामेटवर सराव केला जातो.


लक्ष्य एव्हरेस्ट
एव्हरेस्ट सर करणे हे माझे स्वप्न आहे. कामेट मोहीम प्री-एव्हरेस्ट आहे. त्यामुळे या मोहिमेवर मी भरपूर मेहनत घेतली आहे. या मोहिमेत आम्ही नक्की यशस्वी होऊ.’
शेख रफिक तौहेत