आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद: योजना राबवण्यात गुरुजीही ढकलपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी शासन शिक्षकांमार्फत काही चांगल्या योजना राबवत आहे, परंतु अनेक शिक्षकांना या शासकीय योजनांची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी गुरुजींना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणात शिक्षकच नापास होत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. त्यामुळे ‘आडातच नाही तर पोहर्‍यात येणार कोठून’, ही स्थिती आहे. तर, दुसरीकडे या शिक्षकांना भलत्याच कामांचा बोजा दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जर त्यांना फक्त ज्ञानदानाचेच काम दिले तर मुलांची गुणवत्ता खूप सुधारू शकेल, असा शिक्षक संघटनांचा दावा आहे.

वैजापुरातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यास चाचणीचा अहवाल सादर केला. गुणवत्तेत विद्यार्थ्यांमध्ये प्रगती होत असल्याचा दावा या संस्थेने केला आहे. प्रत्यक्षात आकडेवारीत मात्र औरंगाबाद शेवटून पहिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशोधन अभ्यासातील प्रमुख योजना गुरुजींना माहिती आहेत की नाही, याबाबत संस्थेने माहितीचे संकलन केले असता त्यातूनच शिक्षक याबाबत किती अनभिज्ञ आहेत हे उघड झाले.

शिक्षकांनी राबवलेले पाच उपक्रम : शासकीय योजनेत शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वाचनक्षमता (गुणवत्तापूर्ण वाचन), प्रेरणादायी वाचन, आनंददायी वाचनकेंद्री भाषा शिक्षण प्रकल्प (चांगल्या गोष्टी), वाचन कोपरा (भिंतीवर कविता, सुविचार), लेप वाचन (तरबेज वाचन) असे पाच उपक्रम राबवले.

उपक्रम आणि स्थिती
उपक्रम 1: वाचनक्षमता वाढवण्यात अपयश : विद्यार्थ्यांची वाचनक्षमता वाढवण्यास औरंगाबाद विभागातील गुरुजी नापास झाले आहेत. विद्यार्थ्यांना सरस अभ्यासक्रमात पुढे नेण्यासाठी औरंगाबादचा नंबर पुढे आहे, परंतु वाचनक्षमता वाढवण्यासाठी केवळ 50 टक्के शिक्षक ही योजना राबवण्यात यशस्वी ठरले आहेत. 50 टक्के शिक्षकांमध्ये अनास्था असल्याचे आढळून आले.

> औरंगाबाद- 50.59, जालना- 42.85, बीड- 72.22, परभणी- 60.41, हिंगोली- 61.45

उपक्रम 2: प्रेरणादायी गोष्टी शिकवण्यातही मागे : फलकावर प्रेरणा देणार्‍या कविता, लेख आदी उपक्रमांत औरंगाबाद जिल्ह्याची आकडेवारी सर्वाधिक आहे; परंतु 28 टक्के मुलांना प्रेरणादायी गोष्टी शिकविण्यास मागे पडत आहेत.

> औरंगाबाद- 72.28, जालना- 21. 42, बीड- 34.25, परभणी- 35.52, हिंगोली- 31.25

उपक्रम 3 : आनंददायी वाचनातही अनास्था : आनंददायी वाचनकेंद्री भाषा शिक्षण या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना आनंददायी वाचनाची चांगली सवय लावण्यात जिल्ह्यात 75 टक्के गुरुजींनी चांगले काम केले आहे, परंतु उर्वरित 25 टक्के गुरुजींमध्ये अनास्था आहे. सर्वाधिक चांगले काम करणारा परभणी जिल्हा यात सरस ठरला असून 92 टक्के शिक्षकांचा यात समावेश आहे.

> औरंगाबाद- 75.90, जालना- 70. 33, बीड- 67.59, परभणी- 92.10, हिंगोली- 58.33

उपक्रम 4: वाचन कोपरा योजनेत यश : वर्गात वाचन कोपरा ही योजना राबवण्यात 93 टक्के गुरुजींनी पुढाकार घेतला आहे, तर 7 टक्के गुरुजी मागे आहेत.

> औरंगाबाद- 93.97, जालना- 97.31, बीड- 86.11, परभणी- 96.05, हिंगोली- 97.91

उपक्रम 5: लेप उपक्रमातही प्रगती : जिल्ह्यात मुलांना वाचनात तरबेज करण्यासाठी एक चांगला प्रयोग राबवताना गुरुजी दिसतात, मात्र 8 टक्के गुरुजी आपले कर्तव्य सोडून मुख्य कार्यालय व इतर गोष्टींत लक्ष देताना दिसतात.

> औरंगाबाद- 92.77, जालना- 71. 42, बीड- 70.36, परभणी- 92.10, हिंगोली- 68.75