आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Zilha Parishad Ex President Cast Certificate Issue

‘नाहिदबानो’ निकाल खंडपीठाने राखून ठेवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नाहिदबानो पठाण यांनी विभागीय जात प्रमाणपत्र वैधता समितीच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली असून, प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. खंडपीठाचे न्या. बी.पी. धर्माधिकारी व न्या. रवींद्र घुगे यांनी शुक्रवारी (20 सप्टेंबर) निकाल राखून ठेवला.

जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा नाहिदबानो पठाण यांच्या मोमीन जातीचे वैधता प्रमाणपत्राचा दावा खंडपीठाने फेरपडताळणीसाठी जातवैधता समितीकडे पाठवला होता. वैधता समितीच्या तीन सदस्यांनी एकमताने त्यांचा दावा अवैध ठरवला होता. यामुळे विभागीय आयुक्तांनी जि.प. अध्यक्षपद रिक्त दाखवले. उपरोक्त पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शारदा जारवाल निवडून आल्या. खंडपीठाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास परवानगी दिली होती, परंतु निवडून आलेल्या व्यक्तीस कामकाज करण्यास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. नाहिदबानो प्रकरणाची खंडपीठात 11 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू आहे. 12 सप्टेंबर रोजी युक्तिवाद अपूर्ण राहिल्यामुळे खंडपीठाने पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला ठेवली होती. त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे.

प्रकरणात पठाण यांच्या वतीने अँड. एन. पी. पाटील जमालपूरकर यांनी बाजू मांडली, तर अनिता चोपडेतर्फे अँड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले. दरम्यान, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून, 21 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्यास वेळ दिला आहे. निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख 27 सप्टेंबर आहे. निवडणुकीसंबंधीची सूचनाही याच वेळी प्रसिद्ध केली जाईल.