आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad Zilha Parishad High School Education Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद ‘ढ’; जोडाक्षरे आणि वाचनाच्या बाबतीतही बोंबच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी शाळांच्या तुलनेत भरवशाची नोकरी आणि चांगला पगार असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान देण्यात अपयशी ठरत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांना साधे मराठी वाचनही करता येत नाही. एवढेच नव्हे तर जोडाक्षरांचा योग्य उच्चार, काना-मात्रा आणि उकाराचे मूलभूत ज्ञानही विद्यार्थ्यांना नाही. वाचनाच्या बाबतीत तर औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची योग्यता केवळ 35 टक्क्यांएवढी आहे. विशेष म्हणजे हे सगळे निष्कर्ष राज्य शासनानेच केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. औरंगाबाद विभागात गुणवत्तेच्या बाबतीत बीड जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. जालना दुसर्‍या, तर हिंगोली जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर आहे.

विभागात सरकारी शाळांची शैक्षणिक गुणवत्ता खालावत चालल्याचे सरकारनेच जारी केलेल्या अहवालातून सिद्ध होते. खासगी शिक्षण संस्थांच्या तुलनेत सरकारी शाळेत शिकवणार्‍या गुरुजी आणि विद्यार्थ्यांवर सरकार सर्वाधिक खर्च करते. असे असताना काही बाबतीत संख्यात्मक वाढ होताना दिसते. मात्र, एकूण गुणवत्तेचा दर्जा दिवसेंदिवस कमीच होत आहे. यावर राज्य शासनाच्या डाएट (डिस्ट्रिक्ट एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) या संस्थेने सरकार दरबारी काही मोलाच्या सूचना केल्या. त्यानुसार ही संस्था दरवर्षी औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदांच्या शाळेत शिकणार्‍या शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या बद्धिमत्तेची चाचणी करते. यात अनेक उपक्रमांचा समावेश असतो. त्यानुसार या संस्थेने विभागातील जि. प. शाळेत शिकणार्‍या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची अभ्यास चाचणी घेतली. विभागात येणार्‍या पाच जिल्ह्यांतील 42 तालुक्यांतील 100 शाळांचा यात समावेश होता. एकूण 400 शिक्षकांनी 1 हजार 600 विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष चाचणी घेतली. या चाचणीत मूलभूत ज्ञान तपासणारे अत्यंत साधे असे फक्त 6 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. 2011-12 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या या चाचणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

काय होती याबाबतची नेमकी चाचणी?
प्राथमिक शिक्षणात येणार्‍या अ,ब,क,ड पासून सलग वाचन करणार्‍या विद्यार्थ्यांचा या चाचणीत समावेश करण्यात आला. प्रत्येक शाळेतील 100 विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान तपासणारे 6 साधे प्रश्न विचारण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे टक्केवारीत देण्यात आली. ती पुढीलप्रमाणे.

वाचनाची योग्य गती
वाचनात औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी ढकल पास आहेत. केवळ 35 टक्के विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरे दिली. उर्वरित 65 टक्के विद्यार्थ्यांना साधे मराठी वाचता येत नसल्याचे उघड झाले. वाचन ही मूलभूत बाब आहे. तीच येत नसेल तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न पडतो.

बीड 78.24 टक्के, परभणी (70.39) , हिंगोली ( 55.02), जालना ( 58.33), आणि औरंगाबाद ( 35.11).

जोडाक्षरांचा योग्य उच्चार
जोडाक्षरांचा योग्य उच्चार करण्यातही औरंगाबाद जिल्ह्याची टक्केवारी केवळ 46 टक्के इतकी भरली. सर्वात कमी उत्तरे देणार्‍या मुलांमध्ये औरंगाबाद सर्वात पुढे आहे. वाचनच येत नसताना योग्य उच्चरांची अपेक्षा करणेच नको. त्यामुळे ही मुले भविष्यातील स्पर्धेत कशी टिकणार, हा प्रश्न आहे.

परभणी- 65.78, हिंगोली- 58.33, जालना- 63.49, बीड-77.16 टक्के.

काना-मात्रा, उकारांचा उच्चर
या प्रश्नात विद्यार्थ्यांना साधा काना-मात्रा ओळखता येत नसल्याचे स्पष्ट झाले. यातही औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक सर्वात खाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील केवळ 67 विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर योग्य उत्तरे दिली. म्हणजेच 33 टक्के मुलांना काना- मात्रा व उकारांचे कोडे उलगडत नसल्याचे स्पष्ट होते. यावरून त्यांच्या प्रगतीची कल्पना सहज येते.

परभणी- 74.10, हिंगोली- 70.31, जालना-70.23, बीड -85.41

शब्दांचे योग्य उच्चार
यातही जिल्ह्यातील 18 टक्के मुले मागे पडली आहेत. बोलताना प्राथमिक उच्चर करण्यात मुलांमध्ये अज्ञान दिसते. औरंगाबादच्या तुलनेत इतर जिल्ह्यांची स्थिती चांगली आहे.
परभणी- 92.43, औरंगाबाद- 83.33, हिंगोली-85.90, बीड- 93.98, जालना-80.95

शब्दांचे एकसंघ वाचन
शब्दांचे एकसंघ वाचन करण्यात औरंगाबादची 35 टक्के मुले मागे आहेत. सलग वाचन करण्यात ते अपयशी ठरले आहेत. औरंगाबादच्या खाली जालना, हिंगोली आहेत. याचेच समाधान जिल्हा मानू शकतो.
परभणी- 66.11, औरंगाबाद- 65.79, हिंगोली- 59.79, बीड- 71.06, जालना-55.05

मुळाक्षरांची योग्य ओळख
अ,ब,क,ड या बाराखडीच्या योग्य वाचनात जिल्ह्यातील मुलांची टक्केवारी चांगली असल्याचे विभागाला वाटेल. मात्र, साधी शालेय स्तरावर मुळाक्षरे ओळखण्यातही 5 टक्के मुलांना जमत नसेल तर ते निरक्षरच ठरत आहेत.

परभणी- 95.60, औरंगाबाद- 95.23, जालना-96.13, बीड- 98.61, हिंगोली-94.79


काय आहे संस्थेचे काम
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वैजापूर, ही संस्था विद्यार्थ्यांमधील गुण-दोषांचा अभ्यास करते. विभागातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये वाचनविषयक इष्ट सवयी जोपासण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचा अहवाल सरकारला दरवर्षी सादर करते. यात पुढील
कामांचा समावेश होतो.

1) सरकारी शाळेतील गुणवत्तेचा दर्जा तपासणे,
2) शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देणे,
3) विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणे,
4) खासगी शिक्षण संस्थांच्या स्पध्रेत टिकण्यासाठी अभ्यासगट तयार करणे, विविध उपक्रम घेणे,
5) तपासणीसाठी अचानक शाळांवर धाडी टाकणे.

थेट सवाल- पी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, जि. प.

डाएटच्या अहवालाचा निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहे.
मी त्याबाबतचा अहवाल अद्याप बघितला नाही.

तसा निष्कर्ष असेल तर आपली भूमिका काय ?
..तर मग सुधारणा करण्यासाठी वेगळे नियोजन करावे लागेल.

खासगी शाळांच्या तुलनेत नवीन सुधारणा काय करणार ?
यासंदर्भात पुण्यात होणार्‍या बैठकीत वेगळे विचारमंथन होणार आहे. वरिष्ठांच्या सूचना व स्थानिक पातळीवर काय करता येईल यासाठी प्रयत्न करू.

जि. प. शाळांची गुणवत्ता उत्तम
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. जि.प. शाळेत शिकणार्‍या मुलांची गुणवत्ता उत्तम आहे. खासगीच्या तुलनेत सरकारी शाळेतील विद्यार्थी सरस आहेत. पूर्वीपेक्षा शिक्षणात मुले पुढे जात असल्याचे चित्र आहे.
- डॉ. सुभाष कांबळे, प्राचार्य, डाएट