आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जि.प.च्या प्रयत्नातून 16 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असतानाही अनेक पालक आर्थिक परिस्थितीमुळे हतबल ठरतात. अशा कुटुंबातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील 25 चिमुरड्यांवर जिल्हा परिषदेच्या प्रयत्नातून शस्त्रक्रिया केल्या जात असून आतापर्यंत 16 मुलांना जीवनदान देण्यात आले आहे. उर्वरित मुलांवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहेत.

पालकांकडून एक रुपयाही न घेता जीवनदायी योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जि. प. आरोग्य विभाग, रोटरी क्लब इनलाइट आणि कमलनयन बजाज हॉस्पिटलने या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

जुलै 2012 मध्ये आरोग्य विभागाच्या वतीने 0 ते सहा वर्षे वयोगटातील दोन लाख 69 हजार 323 मुलांची तपासणी केली. त्यात 76 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे निदान करण्यात आले. सीईओ बनकर यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये 30 हजार रुपये खर्च करून दुसरी तपासणी केली असता यात 25 मुलांना शस्त्रक्रियेची तातडीने गरज असल्याचे, तर 51 मुलांना केवळ औषधोपचार करण्याची गरज असल्याचे समोर आले. या मुलांच्या शस्त्रक्रिया आरोग्य विभागाच्या जीवनदायी योजनेतून करण्याचे आदेश बनकर यांनी दिले होते. या योजनेअंतर्गत एका शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये खर्च करण्यात येतो. उर्वरित खर्च पालकांना करावा लागतो. मात्र, या पाल्यांचे पालक ही रक्कम देऊ शकत नसल्याने प्रशासनानेच ही जबाबदारी घेऊन शस्त्रक्रिया करण्याची शासनाकडे मागणी केली होती. मात्र, शासनाने हा प्रस्ताव फेटाळल्याने स्वयंसेवी संस्था आणि उद्योगपतींकडून मदत घेऊन शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

27 लाखांचा खर्च

25 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी 27 लाख रुपये खर्च येणार होता. जि. प. आरोग्य विभागाकडे केवळ 20 लाख रुपये निधी उपलब्ध होता. त्यातून 16 गरजू चिमुरड्यांवर टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन मुलांवर शिर्डी, एकावर मुंबईत, तर इतरांवर कमलनयन बजाजमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उर्वरित नऊपैकी पाच मुलांवर याच आठवड्यात कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहेत. त्यासाठी लायन्स क्लब इनलाइट, आरोग्य विभाग आणि हॉस्पिटलच्या वतीने खर्च केला जाणार आहे.

पालकांची तयारी नाही

नऊपैकी एका मुलाचे कुटुंबीय गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहे. पाच मुलांवर औरंगाबादमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. उर्वरित तीन मुलांवर अवघड शस्त्रक्रिया करणे अपेक्षित असल्याने त्यांना मुंबईला नेले जाईल. मात्र, त्यांचे पालक यासाठी तयार नाहीत. आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांची मनधरणी केली जात आहे.

बनकर यांची महत्त्वाची भूमिका
या चिमुरड्यांना जगवण्यासाठी वर्षभरापासून प्रयत्न केले जात आहेत. यात सीईओ बनकर यांची महत्त्वाची भूमिका आहे. एनजीओ, लायन्स क्लब आणि इतरांचे सहकार्य मिळवण्यात त्यांनी प्रयत्न केले.
डॉ. विजयकुमार वाघ, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा परिषद