आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दोषी अधिकार्‍याचा प्रभार दुसर्‍या दोषीकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

50 ते 60 तक्रारी, डझनभर चौकशा आणि दोषी असतानाही शाखा अभियंता राजेंद्र गुरव यांना जि.प.ने अधिकाराचा गैरवापर करून वरिष्ठ पदाचा कार्यभार दिल्याचा पर्दाफाश डीबी स्टारने 12 फेब्रुवारी रोजी केला. एका प्रकरणात गुरव यांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्यासंदर्भात लघु पाटबंधारे विभागाने जि.प.ला वारंवार पत्रव्यवहार केला; परंतु जि.प.ने कारवाईचा प्रस्ताव तर पाठवलाच नाही, उलट अधिकाराचा वापर करून गुरव यांना वरिष्ठ पदाचा कार्यभार सोपवला. डीबी स्टारचे वृत्त प्रकाशित केले त्याच दिवशी गुरव यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यामध्येही एका दोषीला हटवून दुसर्‍या दोषी अधिकार्‍याला उपअभियंत्याचा प्रभार देण्याचा अफलातून आदेश काढण्यात आला आहे.

देवेंद्र अप्पाही दोषी : एम. देवेंद्र अप्पा सध्या कन्नड सिंचन उपविभागाचे उपअभियंता आहेत. गुरव यांना बढती देण्यापूर्वी औरंगाबाद उपविभागाचा प्रभार त्यांच्याकडेच होता. दरम्यान, नोव्हेंबर 2011 ते मार्च 2012 या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदी असताना देवेंद्र अप्पा यांनी अनेक प्रकरणांत अनियमितता केली. या प्रकरणाची चौकशी लघु पाटबंधारे विभागाने करून अप्पा यांना दोषी ठरवले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा परिषदेने अप्पांविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले नाही. अशा भ्रष्ट अधिकार्‍याला पुन्हा औरंगाबाद उपविभागाचा प्रभार देण्यात आला आहे.

कारणे दाखवा नोटीस : 12 फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक सोंदनकर यांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सोंदनकर यांनी याच दिवशी राजेंद्र गुरव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. नायगव्हाण येथील कोल्हापुरी बंधार्‍याच्या दुरुस्ती कामाची अंदाजपत्रके, निविदा आणि मोजमाप पुस्तिका 24 तासांच्या आत सादर कराव्यात, असे या नोटिशीत म्हटले.

38 लाख निलंबन निधी : दरम्यान, कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर राजेंद्र गुरव यांनी जिल्हा परिषदेला 13 फेब्रुवारी रोजी कागदपत्रे सादर केली. त्यानंतर सिंचन विभागाने या कागदपत्रांचा अभ्यास केला आणि नायगव्हाण क्रमांक 1 आणि 2 कोल्हापुरी बंधार्‍यासाठी वापरण्यात आलेला 38 लाख 1 हजार 942 रुपये निधी वाया गेला असल्याचा निष्कर्ष काढला. हा निलंबन निधी निश्चित करून जि. प. सिंचन विभागाने लघु पाटबंधारे विभागाला कळवला असून 15 फेब्रुवारी रोजी दोषारोपपत्र तयार केल्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी लघु पाटबंधारे विभागाला पाठवण्यात आले.

सक्षम अधिकारी नाही
कन्नडचे उपअभियंता देवेंद्र अप्पा यांना गुरव यांच्याकडील प्रभार सोपवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत हा प्रभार देण्यासाठी जिल्हा परिषदेत कोणताही सक्षम अधिकारी नसल्याने अप्पा यांचे नाव सुचवले आहे, परंतु अद्याप त्यांनी प्रभार स्वीकारलेला नाही.
दीपक सोंदनकर, कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग