आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad's Real Story Of 1970 Come Film Director Nikhil Mahajan

औरंगाबादेतील 1970 च्या सत्यघटनेवर काढणार चित्रपट - दिग्दर्शक निखिल महाजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मूळचा औरंगाबादच्या निखिल महाजनला त्याच्या पहिल्याच ‘पुणे 52’ चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने संवाद साधून त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेतले. 1979 मध्ये औरंगाबादेत घडलेल्या एका घटनेवर ‘थ्रिलर’ चित्रपट काढणार असल्याचे त्याने सांगितले.

जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘पुणे 52’ चित्रपटाच्या माध्यमातून औरंगाबादचा दिग्दर्शक निखिलने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. निखिल म्हणाला, ‘पुणे 52’ चित्रपटाची कथा अतिशय दमदार होती. पुण्यात 1992 ला घडलेल्या सत्यघटनेवर ती आधारित होती. सत्यघटनेवरील कहाणी ही कायम प्रेक्षकांना अपील करते. पुणेसाठी गिरीश कुलकर्णींची उत्तम साथ लाभली. चित्रपटाचे संवाद त्यांनीच लिहिले होते. मराठीत सुरू असलेल्या ट्रेंड्समध्ये माझा चित्रपट सर्वार्थाने वेगळा ठरला. चित्रपटात एकही गाणे नव्हते. आयटम साँगची निर्मिती करण्याचा सल्ला अनेकांनी मला दिला, पण मला आयटम साँग नको होते. एकाही गाण्याविना चित्रपट यशस्वी झाला.

नवा प्रोजेक्ट औरंगाबादवर
निखिल औरंगाबादेत 1970 मध्ये घडलेल्या एका घटनेवर रहस्यपटाच्या निर्मितीत मग्न आहे. संहिता लिहून तयार झाली आहे. मात्र, अद्याप कलावंत आणि इतर बाबी ठरायच्या आहेत. हा चित्रपट हिंदीतून करण्याचा निखिलचा मानस आहे. काही भाग औरंगाबादेत चित्रित करण्यात येणार आहे. 1970 मधील औरंगाबाद दाखवण्यासाठी सेटची निर्मिती करावी लागेल, असे निखिलने स्पष्ट केले.

मराठीत खूप बंधने येतात
मराठीत उत्तमोत्तम साहित्याची आणि दज्रेदार नाटकांची निर्मिती होते. त्यामुळे मराठीतील प्रेक्षक मनोरंजनासाठी फक्त चित्रपटांवर अवलंबून नाहीत. चित्रपटांबाबत मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ आणि सुज्ञ आहेत. वास्तवाशी नाते सांगणार्‍याच गोष्टींचे स्वागत केले जाते. त्यामुळे चित्रपटनिर्मितीवर खूप बंधने आली आहेत. या प्रमाणात दक्षिण भारतात नाटकांचे प्रमाण किंवा इतर मनोरंजक कलाकृतींचे प्रमाण अत्यल्प असल्याने चित्रपट अधिक चालतात. काल्पनिक, अतिरंजित चित्रपट वास्तवाशी काहीही संबंध नसलेले चित्रपट तेथील प्रेक्षक पाहतात. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी होतात.


निखिल होलीक्रॉसचा विद्यार्थी
निखिल हा औरंगाबादचा असून होलीक्रॉस इंग्लिश स्कूलमध्ये 10 वीपर्यंत शिक्षण घेतले. देवगिरी महाविद्यालयात अकरावी आणि बारावी पूर्ण केली. इंजिनिअरिंगसाठी बारामती येथे गेला. तेथे पुरुषोत्तम करंडकासाठी निवड झाली. यामध्ये 2007 मध्ये ‘अकल्पित’ हे थ्रिलर नाटक, तर 2008 मध्ये ‘मला शोधताय का?’ हे विनोदी नाटक केले. ‘एका बंगल्यात घडले’ अशा नाटकांनी आवड वाढत गेली. यानंतर इंजिनिअरिंग सोडून ऑस्ट्रेलियात इंटरनॅशनल फिल्म स्कूल, सिडनीमध्ये दाखल झाला. भारतात परतल्यावर रामगोपाल वर्मा यांच्याकडे काम सुरू केले. हिंदुजा ग्रुपच्या प्रॉडक्शन कंपनीसाठी ‘बिल्ला 2 ’ या तामिळ चित्रपटाच्या ‘स्क्रिप्ट डॉक्टरिंग’चे काम केले.